Nibandh Lekhan In Marathi | निबंध लेखन कसे करावे

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now

लेखन हे प्रत्येकाला जमलेच पाहिजे (nibandh lekhan in marathi)

nibandh lekhan in marathi
nibandh lekhan in marathi

मराठी ही आपली मातृभाषा आहे. तुम्ही अगदी लहान असताना आई बाबा याच मायेच्या भाषेत तुमच्याशी बालू लागले. आजी आजोबांनी गोड गोड गोष्टी सांगितल्या याच आपल्या भाषेत. आपलं दुखले खुपलं तुम्ही आरडून ओरडून सांगता याच भाषेत. दोस्तांशी भांडता, गप्पागोष्टी करता याच आपल्या भाषेत. बडबडगीतं, देवाची स्तोत्रं, आरत्त्या बोबड्या आवाजात म्हणू लागला याच भाषेत. अशी ही आपली मराठी भाषा आपल्याला आवडते. आपण आपल्या आईवर प्रेम करावे तसे आपण तिच्यावर प्रेम करतो.

शाळेत गेल्यावर तर काय, मराठी भाषा हा वेगळा विषय म्हणून तुम्ही शिकू लागता. छान छान चित्रे असलेले तुमच्या पुस्तकातील घडे आणि कविता तुम्हाला खूप आवडतात. इतर विषयांचा अभ्यासही तुम्ही मराठी भाषेतूनच करता आणि करणार देखील आहात.

आपल्या महाराष्ट्र राज्याचा राजकारभार चालतो मराठीतून. आपल्या राज्यातील लोक मराठीतून सर्व व्यवहार करतात. या राज्यामधले आपले जीवन, या माणसांमधले आपले संबंध उत्तम आणि सुखकारक ठेवायचे असतील तर आपल्याला आपल्या भाषेचा उत्तम अभ्यास करायला हवा. तुम्ही तुमच्या या आवडत्या विषयाचा अभ्यास खूप करात देखील असाल. कारण आपल्या या आवडत्या भाषेचा अभ्यास तुम्हाला अभ्यासासारखा वाटतच नाही. धड्यांखालची प्रश्नोत्तरे तोंडपाठ असतात, कविता तर केव्हाच पाठ होऊन जातात.

पण तरीही मराठीच्या परीक्षेत तुम्हाला इतर विषयांप्रमाणे भरपूर गुण मात्र मिळत नाहीत. असे का बरे? महत्त्वाचे कारण एकच आहे. ते म्हणजे तुम्ही पुस्तकाचा अभ्यास कसून केला असलात तरी निबंधलेखनाकडे पाहिजे तेवढे लक्ष दिलेले नसते. तसे तुम्ही वर्षाकाठी सात-आठ निबंध लिहीत असता. पण खरं सांगू? नुसते सांगितलेले निबंध आई, बाबा, ताई, वाहिनी, दादा यांच्या मदतीने लिहून गुणही चांगले मिळविले असले तरी त्यातून तुमची निबंधलेखनाची तयारी झाली असे म्हणता येत नाही. म्हणून तर परीक्षेत विचारलेल्या विषयांवर निबंध लिहिताना पुष्कळांची फजिती होते आणि मग वाटते निबंध लिहिणे फारच अवघड आहे बुवा ऐनवेळी काहीच आठवत नाही.

आठवलं तर शब्द सापडत नाही. शब्द सापडले तरी लिहावे कसे हे पटकन् उमगत नाही. मग काय, जाने दो। सारखी अवस्था होते तुम्हाला माहीत असते की मराठीत कमी गुण मिळाले तरी आपण नापास नक्कीच होणार नाही. निबंध देऊ कसा तरी ठोकून. मिळतील ते मिळतील गुण. आणि तुम्ही निबंधलेखनाकडे सरळ दुर्लक्षच करू लागता. नाहीतरी आपण खूप निबंध लिहिले तरी परीक्षेत भलताच कुठला तरी विचारतात हो ना. मग लिहू तेव्हाच येईल तसे, असा तुमचा विचार असतो बरोबर ना.

दरवर्षी असे दुर्लक्ष करता करता नववी दहावीत गेल्यावर लक्षात येते की अरे अभ्यास करून देखील आपण इतर विषयात चांगले गुण मिळवू शकतो. पण मराठीमध्ये अभ्यास करूनही आपल्याला फार कमी गुण मिळत आहेत. दहावीत तर किती स्कॉलर मुलांची गुणवत्ता यादीतील निवड हुकते ती केवळ मराठीने दगा दिल्यामुळे. अशी वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून आपण आत्ताच काळजी घेऊ या आणि निबंधलेखनासाठी भरपूर तयारी करू या. तुमच्या मराठीच्या परीक्षेत शंभरापैकी जवळ जवळ पस्तीस गुण तुमच्या मराठीतील स्वतंत्र लेखनसाठी असतात. म्हणजे गद्यपद्याच्या अभ्यासाइतकाच वेळ तुमच्या निबंधलेखनासाठी द्यायला हवा, खरं की नाही?

खरं तर तुम्हाला ज्या विषयांवर निबंध लिहायचे असतात ते अवघड अजिबात नसतात. त्या विषयासंबंधी बरीच माहिती तुमच्याजवळ आहे अशी खात्री करूनच विषय दिले जातात. पण त्याविषयी तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टी तुम्ही तुमच्या डोक्यात व्यवस्थित ठेवलेल्या नसतात. त्यामुळे तुम्हाला त्या वेळेवर आठवत नाहीत. शिवाय अशी आठवण करण्याची सवयही डोक्याला लावावी लागते ना पुन्हा त्या आठवलेल्या गोष्टी योग्य क्रमाने आणि छान शब्दात कशा लिहायच्या याचाही सराव करावा लागतो.

घरात स्वयंपाकचे सर्व साहित्य भरलेले असले तरच पटकन् आणि चांगला स्वयंपाक करता येतो. तसे आपल्याजवळ निबंधलेखनासाठी भरपूर सामग्री आपण जमवलेली असेल तर कोणत्याही विषयावर पटकन् निबंध लिहिता येतो.

काय काय सामग्री लागते लेखनासाठी? भरपूर शब्दसंपत्ती हवी. तऱ्हेतऱ्हेचे , तऱ्हेतऱ्हेचेच्या वाक्यरचना यांनी शब्दांचा खजिना भरलेला हवा पाहिजे.

याशिवाय ज्यावर निबंध लिहायचा आहे त्याविषयीही भरपूर माहिती तुमच्याजवळ हवी आणि त्यांचे वेळेवर स्मरणही व्हायला हवे.

निबंधलेखन । nibandh lekhan in marathi

ज्याला कोणाला परिच्छेदरचना, कल्पनाविस्तार, कथालेखन जो छान करू शकतो त्याला निबंधलेखनही उत्तम करता येते. परिच्छेदलेखन म्हणजे दिलेल्या मुद्यांचा विस्तार करणे, कल्पनाविस्तार म्हणजे दिलेली कल्पना स्पष्ट करणे आणि कथालेखन म्हणजे क्रमाने घटनांचे वर्णन करणे. निबंधलेखनात या तीनही गोष्टी कराव्या लागतात. निबंधलेखनात परिच्छेदलेखनच करावे लागते. फक्त त्याचे मुद्दे आपले आपल्याला काढावे लागतात. ते आपल्याच डोक्यातले विचार, कल्पना, आपले अनुभव, यातून स्पष्ट करावे लागतात. म्हणजे एकप्रकारे कल्पनाविस्तारच म्हणा की आणि कथा अशी सूत्रबद्ध सांगावी लागते म्हणजे त्यातले प्रसंग ठराविक क्रमानेच लिहावे लागतात तशीच ठराविक क्रमाने मुद्यांची मांडणी निबंधात करावी लागते. म्हणूनच आधी परिच्छेदलेखन, कल्पनाविस्तार, कथालेखनात कौशल्य मिळवायचा प्रयत्न करायला हवा.

निबंधलेखनासाठी तुम्हाला मुद्दे दिलेले नसतात. नुसते शीर्षक दिलेले असते. त्यासाठी मुद्दे तुमचे तुम्हाला काढावे लागतात. दिलेल्या विषयाबद्दल काही ना काही माहिती तुमच्याजवळ असतेच. असेच विषय दिले जातात. तुमच्या भोवतालचे जग म्हणजे पशू, पक्षी, प्राणी, निसर्गातील अन्य गोष्टी, तुमचे गाव, प्रेक्षणीय ठिकाणे, देश, सणवार, शाळा, सहली, शाळेतले समारंभ, गावातले समारंभ-कितीतरी अनुभव तुमच्याजवळ असतात.

एकता, बंधुभाव, समता, भूतदया, देशभक्ती, परोपकार सारखे कितीतरी सुंदर विचार तुमच्या पुस्तकातून, कवितांमधून, गोष्टींमधून तुम्हाला माहीत झालेले असतात. बालसुलभ अशा कितीतरी रम्य कल्पना तुमच्या डोक्यात सदैव घोघावत असतात. पतंग उडवताना तुम्हाला वाटते आपण पतंग झालो तर काय मजा होईल झाडावर बसून यथेच्छ पेरू खाणारा पोपट पाहून तुम्हाला पोपट व्हावंसं वाटतं, तुम्हाला कधी इंजिन व्हावंसं वाटतं, तर कधी कंडक्टर बस तुमच्या याच कल्पनाशक्तीला भरपूर वाव मिळतो निबंधलेखनात. मुद्दे काढण्यासाठी आपण अनुभवांचा खजिना भरलाच आहे. आणि लेखन सुंदर होण्यासाठी शब्दांचा, वाक्यांचा, कल्पनांचा खजिना पण जवळ आहे.

परीक्षेत कोणकोणत्या प्रकारचे निबंध येतात बरं तुम्हाला सांगा पाहू? आपण काही उदहरण पाहू यात जसे कि माझा देश, आवडता सण, पाहिलेली जत्रा, आमचे स्नेहसंमेलन, आमची सहल असे निबंध विचारले जातात. हे असे निबंध म्हणजे कशाचे ना कशाचे वर्णन केलेले असते. माझा देश म्हणजे देशाचे वर्णन, जत्रा म्हणजे जत्रेचे वर्णन केलेले असते. अशा प्रकारच्या निबंधाला म्हणतात वर्णनात्मक निबंध.

आपण अनुभवलेल्या गोष्टीचे तुम्हाला किती हुबेहूब वर्णन करता येते ते यावरून समजते. तुमचे वर्णन वाचून वाचणाऱ्याला तुम्ही वर्णन केलेली गोष्ट प्रत्यक्ष पाहतोय असे वाटले पाहिजे. अशा प्रकारचे लेखन म्हणजे कौशल्याचे काम आहे. तुमच्या पुस्तकात अशी यथातथ्य वर्णने कितीतरी पाठांतून तुम्ही पाहिली असतील. ती हुबेहूब कशामुळे वाटतात हे तुम्ही लक्षात घ्यायला हवे. म्हणजे हळूहळू तुम्हालाही ते कौशल्य आत्मसात करता येईल.

दुसरा प्रकार आत्मवृत्ताचा. ‘मी पक्षी बोलतोय’ किंवा ‘ढगाची आत्मकथा’ किंवा ‘पोस्टमनची आत्मकथा’ असेही काही निबंध तुम्हाला विचारले जातात. आत्मवृत्त लिहिता लिहिता तुम्ही नकळत दुसऱ्याच्या सुखदुःखाचा विचार करायला लागता. गाढवाचे आत्मवृत्त लिहिताना तुम्ही क्षणभर स्वतःला त्याच्या जागी मानलेत तरी त्याची अवहेलना, कष्ट, उपासमार याची तुम्हाला कल्पना येईल. आणि मग कुठल्याही गरीब गाढवाला छळावे असे तुम्हाला वाटणारच नाही. सहानुभूतीचे धडे गिरविण्यासाठी आत्मवृत्त लिहायचे.

“मी अदृश्य झालो तर”-किती मजेदार कल्पना आहे ना? काय काय होईल? चालवा डोकी बर -पडू दे कल्पनांचा पाऊस. त्यातूनच हा मजेदार कल्पनात्मक निबंध तयार होईल. आपले वाचन, श्रवण, अनुभव यातून भरपूर मुद्दे गोळा करायचे, ते नीट क्रमवार लावायचे. आपण शिकलेल्या छान भाषेचा उपयोग करायचा आणि निबंध लिहायचा.

वर्णनात्मक, कल्पनात्मक निबंध आणि आत्मवृत्तलेखन यांचाच तुम्ही सातवीपर्यंत सराव करायचा आहे. येथे उत्तम सराव केलात तर दहावीपर्यंत तुम्ही अगदी सराईतपणे निबंध लिहू लागाल.त्यासाठी क्रमिक पुस्तके कशी उपयोगी पडतील तुमच्या प्रत्येक वेच्यात कुठे ना कुठे वर्णन आहेच. कुठे माणसाचे, त्याच्या हालचालीचे हुबेहूब वर्णन आहे-जसे दमडीचे आहे, दादूचे आहे, शकीलभाईंचे आहे, ताराबाईंचे आहे.

ऋतूंची सुंदर वर्णने केलेली आहेत, भामरागड, कन्याकुमारी या ठिकाणांची आहेत, बल्लूच्या गोष्टीसारखे अनुभवांचे वर्णन आहे, लहानपणच्या आठवणी आहेत. या साऱ्यांचा अभ्यास करताना त्या भाषेकडेही लक्ष द्यायचे. वर्णन सुंदर का वाटते ते शोधायचे आणि त्याची नक्कल करण्याचा सतत प्रयत्न करायचा. म्हणजे हळूहळू तुम्हालाही छान लिहिता येईल.

वर्णनात्मक निबंध

‘माझे आजोबा ‘, ‘मी पाहिलेली सर्कस’, ‘आवडता ऋतू’ हे वर्णनात्मक निबंध आहेत येथे तुमचे वर्णनकौशल्य असे हवे की वाचणाऱ्याला डोळ्यासमोर ते दृश्य आणता आले पाहिजे. तुम्हाला चांगले वर्णन केव्हा करता येईल ? तुमचे निरीक्षण उत्तम असेल तर भोवताली चाललेली प्रत्येक घटना, प्रत्येक गोष्ट डोळ्यांनी, कानांनी उत्तम टिपता यायला हवी. मग सुंदर आणि समर्पक विशेषणे, त्या गोष्टीची इतर गोष्टीशी केलेली तुलना म्हणजेच उपमा यांचा वापर करायला हवा. वाक्ये छोटी छोटी हवीत लांबलचक नकोत. त्यामुळे वाक्यरचनेच्या चुका होणार नाहीत.

वर्णनात्मक निबंधात किती प्रकारची वर्णने तुमच्याकडून अपेक्षित आहेत?

(१) एखाद्या स्थळाचे वर्णन, म्हणजे माझे घर, माझा गाव, एस. टी. स्टैंड, माझे आजोबा, माझी आई अशी व्यक्तिवर्णनेही लिहायला सांगतात.

(२) तुमच्या अनुभवाचे वर्णन असेल आमचा क्रिकेटचा सामना, आमची सहल, मी केलेला प्रवास, वगैरे.

(३) माझा आवडता खेळ, महिना, खेळाडू, पुस्तक, पुढारी वगैरे यांचे वर्णन त्या निबंधात असेल.

(१) स्थळाचे वर्णन करताना कुठे आहे, कसे आहे, त्याची वैशिष्ट्ये आणि त्याच्याशी तुमचा असलेला संबंध म्हणजे झाले की चार मुद्दे. त्यांचा विस्तार केला की निबंध तयार चार परिच्छेदांचा.

(२) अनुभवांचे वर्णन करताना तो अनुभव केव्हा घेतला, कुठे, अनुभवाचे वर्णन आणि त्याचा परिणाम या तीन मुद्यांवर तीन परिच्छेदांत निबंध लिहिता येईल.

(३) माझा आवडता कोण? का? इतर गोष्टीशी तुलना या तीन मुद्यांवर निबंध लिहिता येईल. उदाहरणार्थ, माझा आवडता महिना कोणता ? श्रवण, का? खूप सण, निसर्गसौंदर्य, सुट्या इतर महिन्यांशी तुलना करून मोठेपणा सिद्ध करायचा.

आहे की नाही निबंध लिहिणे सोपे सांगा पाहू? आपण या तीनही प्रकारची उदाहरणे बघू या हं.

माझे घर

माझे घर शाळेच्या पाठीमागेल मंदिर समोर आहे. माझ्या घराच्या फाटकावर माझ्या आईने मोगऱ्याचे झाड लावला आहे. त्याचा सुवास बारा महिने घरीदारी दरवळत असतो. आणि त्याच्या फुलांचा सडा आल्यागेल्याचे स्वागत करतो खरेच किती छान असतात ना फुले.

माझे घर खूप मोठे नाही. आहे छोटेसेच. आमच्या घरी येणारे-जाणारे खूप असतात. आजोबा ओटीवर बसून साऱ्यांचे स्वागत करीत असतात. दाराजवळ आमचा मोत्या बांधलेला असतो. पण कोणावर भुंकायचे, कोणावर नाही हे त्याला बरोबर कळते बर का.

मागच्या दारी छोटेसे अंगण आहे. आम्हा मुलांचे खेळ, अभ्यास सारे येथेच चालते. अंगणातल्या चिंच, आंबा, या झाडांची सावली उन्हाळ्यात कशी गार गार वाटते मागच्या दारी माझ्या आजीचे राज्य असते. कधी गोधडी शिवत, कधी निवडण तर कधी जप करत तिथे बसून ती आम्हा मुलांवर लक्ष ठेवते.

आजी-आजोबा, आई-बाबा भोवती वावरत असली की पुढच्या दारापासून परसदारापर्यंत माझे घर कसे दुलईसारखे उबदार वाटते.

घराचे चित्र राहिले की नाही डोळ्यापुढे उभे ? निबंधात चार परिच्छेद आहेत-प्रवेशद्वार, अंगण, ओटी आणि घराचा मुला मुलींच्या मनावरचा ठसा. यापेक्षा वेगळे मुद्दे सुद्धा काढता येतील. हवं तर स्वयंपाकघर, माजघराचे वर्णन करता येईल. माझे घर म्हणून फ्लॅटचेही वर्णन करता येईल तुम्हांला.

मुद्यांचा विस्तार कसा झाला आहे बघा. मोगऱ्याचा सुवास आणि आल्यागेल्याचे स्वागत, किती थोडक्यात वर्णिले आहे. ओटीवरचे आजोबा आणि मुलांच्या अंगणावर राज्य करणारी आजी, अशा कल्पना तुम्हालाही सुच् शकतात. शिवाय काही वाक्यरचना आणि उपमासुद्धा छान आहेत. पर आहे छोटेसेच हे वाक्य घर छोटे आहे या वाक्यापेक्षा चांगले यादले दुईसारखे उबदार घर ही कल्पना तुम्हाला सुद्धा आवडली असणार.

कल्पनात्मक निबंध

आपल्या सर्वांनाच कल्पना करीत बसायला खूप आवडते ना. विशेषतः आपण जे नाही आहोत आणि जे होण्याची सुतराम शक्यता नाही ते झालो तर काय गमतीजमती होतील याच्या कल्पना करण्यात आपण रमून जातो. ज्या गोष्टी कधीच घडणे शक्य नाही अशा गोष्टी घडल्या तर काय होईल, असा विचार करण्यात सुद्धा आपल्याला मजा वाटू लागते. सूर्य उगवला नाही तर, मृत्यू नसता तर, दुधाच्या नद्या आणि भाकरीची झाडे असती तर, मी पक्षी झालो तर, अशा कल्पनांत प्रत्येकजण केव्हा ना केव्हा रमला असेल. कल्पनात्मक निबंधात अशाच तुमच्या जर-तरच्या गमतीदार कल्पना मजेदार भाषेत लिहायच्या आहेत.

कल्पना अगदी स्वैर विहार करू देत, पण त्यांना वास्तवाचे भान असायला हवे ना. कोणीतरी अशा स्वैर कल्पना केल्यामुळेच काही भौतिक शोध लागले आहेत बरं का ‘चंद्रावर स्वारी’ वेल्स या लेखकाने प्रथम कल्पनेने केली. त्याचाच मागोवा घेत त्याच्या कल्पनेतल्या रॉकेटप्रमाणेच आज चंद्राकडे रॉकेट्स भराऱ्या मारीत आहेत. न जाणो ‘मी अदृश्य झालो तर-‘ या तुमच्या कल्पनेच्या भराऱ्यांमधून एखादा शास्त्रज्ञ तुम्हाला कल्पनेत सुचलेले एखादे रसायन तयार सुद्धा करू शकायचा. काय नेम ! म्हणून कल्पनेचा पतंग अगदी उंच उंच उडू दे, पण दोरी मात्र जमिनीवर उभे राहणाऱ्याच्या हातात असायला हवी.

नाहीतर ‘मला एक लाख रुपये मिळाले तर’ या विषयावर लिहिताना “मी एक राजवाडा बांधेन, जगभर प्रवास करेन, मुलांसाठी मोठे विविध साधनांनी सुसज्ज क्रीडांगण बांधेन असे म्हणालात तर ते काही खरं नाही. कारण त्या एक लाखात तुमचा राजवाडाच काय आज फ्लॅटही बांधता येत नाही.

म्हणून कल्पनांच्या भराऱ्या मारताना वास्तवाचे भान ठेवायचे. कल्पना रम्य हव्यात. हास्यास्पद नकोत, हेही लक्षात ठेवायचे. आता हा खालील दिलेला नमुना पाहुयात.

मी अदृश्य झालो तर –

काल घरातला एक सुंदर फ्लॉवरपॉट माझ्या हातून फुटला. तो आईचा फार आवडता होता. आता आई आल्यावर काय होईल या कल्पनेनं मी अगदी घाबरून गेलो आणि माझ्या एकदम मनात आलं, आपण अदृश्य होऊ शकलो तर-आऽहा ! आई किती रागावली तरी तिला माझ्यावर राग काढता येणार नाही. जरा वेळाने ती मला शोधायला लागेल. मी सापडत नाही असे वाटून तिच्या रागाचे रूपांतर काळजीत होईल. ती आणि बाबा अगदी अस्वस्थ होतील आणि आपण मस्त कोपऱ्यात उभे राहून सर्व पाहू.

असं अदृश्य झालं की काय काय गमती मला करता येतील ? मला कोणीही कुठेही अडवू शकणार नाही. मी कोणतेही कार्यक्रम अगदी स्टेजवरसुद्धा बसून बघू शकेन. अगदी पंतप्रधानांची सभा असो की पु. ल. देशपांड्यांचे भाषण असो, मला सगळीकडे मुक्त प्रवेश असेल.

मी साऱ्या देशभरच काय, जगभर प्रवास करीन. कितीही वेळा आणि कितीही काळ सारी पृथ्वी पालथी घातली तरी कोणाला काय समजणार आहे? स्वतः अदृश्य राहून अनेक गुंडांना लोळवण्यात काय मजा येईल! आसपासच्या साऱ्या गुंडांना चांगली दहशत बसविता येईल. गोरगरिबांना खूप मदत करता येईल, माझ्या समोर घडणाऱ्या गुन्ह्यांचे सर्व पुरावे मला पोलिसांना पुरवता येतील. दुष्टांना शासन घडविता येईल. आणि हो, परीक्षेच्या वेळी मजाच मजा! प्रश्नपत्रिका मला आधीच गुपचूप पाहता येईल. छे! हे मात्र पाप आहे. हे करण्यासाठी का अदृश्य व्हायचे ?

आणि आपण अदृश्य झालो की घरातली माणसं धाई धाई रडतील, जेवणखाण सोडतील, दुःखी होतील, त्याचं काय? त्यांनी दुःखी झालेलं आपल्याला पाहवेल का? छे! नको. त्यापेक्षा आपण आपली चूक कबूल करावी. आई आत्ता थोडी रागावेल, पण नंतर तीच जवळ घेईल ना! नकोच ते अदृश्य होणे।

निबंधाची सरुवात अगदी आकर्षक आणि थोडक्यात झाली आहे. शिवाय शेवट आणि सुरुवात यांचा सुंदर मेळ बसला आहे. थोड्या वाक्यांच्या मर्यादेत केलेल्या कल्पनांमध्ये विविधता आहे. या साऱ्या गोष्टी तुमच्याही निबंधात हव्या.

सरावासाठी हे निबंध लिहा. अगदी सोपे आहेत.

(१) परीक्षा नसत्या तर-

(२) पुस्तके नष्ट झाली तर-

(३) मी पंतप्रधान झालो तर-

(४) शाळा बंद झाल्या तर-

(५) मला देव भेटला तर-

(६) दुसऱ्याच्या मनातले वाचता आले तर-

(७) मला लॉटरी लागली तर-

(८) मी मुख्याध्यापक झालो तर-

(९) दूरदर्शन बंद झाले तर-

(१०) मी पक्षी झालो तर-

(११) शिवनेरी किल्ला बोलू लागला तर-

(१२) मी गर्दीत हरवले / हरवलो तर-

(१३) स्मरणशक्ती नाहीशी झाली तर-

(१४) पाण्यामध्ये घरं बांधता आली तर-

(१५) दुसऱ्या ग्रहावर राहता आले तर-

आत्मवृत्त | nibandh lekhan in marathi

आपण स्वतःला विसरून दुसऱ्याच्या जीवनात प्रवेश करणे, त्याचे जीवन, सुखदुःख जाणून घेऊन ती आपलीच आहेत अशा त-हेने लिहिणे म्हणजे आत्मवृत्त लिहिणे. माणसाला माणूस म्हणून जगायचे असेल तर त्याला दुसऱ्याचा, त्याच्या सुख-दुःखांचा विचार करता यायला पाहिजे. तरच दुसऱ्याबद्दल सहानुभूती निर्माण होईल. आणि सहानुभूती वाटली तरच आपण दुसऱ्यांची दुःखं दूर करायला धडपडू, कमीतकमी दुसऱ्याच्या दुःखाला तरी कारण होणार नाही. दुसऱ्याला कल्पनेने जाणून घेणे हाच आत्मवृत्त लेखनाचा हेतू आहे.

काही मुलांना रस्त्यातून गरीबपणाने जाणाऱ्या कुत्र्याला पाहून दगड उचलून सहजपणे मारावासा वाटतो. एक क्षणभर जर आपणच तो कुत्रा आहोत असा विचार मनात आला तरी त्यांचे हात दगड उचलू शकणार नाहीत. आत्मवृत्तातून हेच साधायचे आहे. तुम्हाला सजीवांचे म्हणजे पशू, प्राणी, कीटक वगैरेंचे आत्मवृत्त लिहायला सांगतात.

एखाद्या व्यक्तीचे लिहायला सांगतात. अगदी एखाद्या निर्जीव वस्तूचे, निसर्गातील गोष्टींचेसुद्धा आत्मवृत्त लिहायला सांगतात. येथेही तुमचे निरीक्षण आणि तुमचे अनुभव तुमच्या उपयोगी पडतील. उदाहरण म्हणून हे आत्मवृत्त पाहू.

चिमणीचे आत्मवृत्त

चिव, चिव, चिव काय कहार आहे मेला! गेले आठ दिवस घरटं बांधण्याचं काम करतेय, पण ती माणसं, सारखी मेली माझी काडी न् काडी फेकून देत आहेत. खरं म्हणजे हे घर किती छान आहे. माझा जन्मच मुळी या घरातला, या फोटोमागच्या घरट्यातच मी जन्माला आले. माझ्या आईचं घरटं नाही बाई पाडलं कोणी याच घरट्यातून मला आईनं एक दिवस उडायला शिकविलं.

मी रोज रोज बाहेर उडायला जाऊ लागले. एक दिवस घरी येऊन पाहिलं तर माझी आईच नाहीशी झालेली. मी घाबरले. मला फार दुःख झालं तेव्हा मला सोबत करायला हा चिमणा मित्र मिळाला. हळूहळू मी दुःख विसरू लागले. पण एवढ्या काळात माझं घरटं पडून गेलं होतं. मग आम्ही दोघांनी याच जागेत घरटं बांधायला सुरुवात केली मिळेल तेथून लांबून लांबून काड्या आणल्या. लोकरीचे धागे, कापूस, चिंध्या, काय काय जमा केलं. आणि किती छान उबदार घर तयार झालं!

पण काल बाहेरून आम्ही एक छान पीस घरट्यात ठेवायला म्हणून घेऊन आले तर घरटंच नाही. कोणीतरी सारं घरटं काढून टाकलं होतं. मला रडू आवरेना. पण माझा सखा माझ्याजवळ आला नि म्हणाला, रडू नको. ही माणसं अशीच असतात. आपल्याला सुखानं जगू देत नाहीत. आपण आपलं समोरच्या पिंपळाच्या झाडावरच घर बांधू, ते कोणी पाडणार नाही. शिवाय तिथे आपले खूप भाईबंध राहतात.मला हे घर सोडताना वाईट वाटलं, पण काय करणार? आता आम्ही या पिंपळावरच अगदी सुखात राहात आहोत.


अशाच प्रकारच्या पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा



Leave a Comment