Pavsala nibandh in marathi । १० ० ० शब्द

pavsala nibandh in marathi – उन्हाळा संपल्यावर पावसाळ्याची सुरवात होते. जून महिन्याच्या शेवटी पाउस पडू लागतो. जुले आणि ऑगस्ट महिन्यात खूप पाउस पडतो. आकाशात काळे-काळे ढग जमलेले असतात. पावसामुळे लोकांना गरमी पासून सुटका मिळते.
पावसाचा मौसम फारच आनंददायक असतो. उन्हामुळे मरगळलेली झाडे-रोपे हिरवीगार, तरतरीत दिसू लागतात, जमीनीवर हिरवी चादर पसरल्यासारखी दिसते. आकाशात केव्हां-केव्हां इन्द्र धनुष्यही दिसते. शेतकरी पेरणी करण्यासाठी शेताकडे निघून जातात. सुकलेल्या तलाव, तळे आणि नद्यांमध्ये पाणी भरून जाते. चहूंकडचे दृष्य फारच सुंदर वाटू लागते.
वर्षाकाळात बऱ्याच त्रासदायक गोष्टी घडतात. गावांत आणि शहरात पुराचे पाणी शिरते. त्यामुळे घरांचे आणि पीकांचे नुकसान होते. पुराच्या पाण्यात माणसे, पशु-पक्षी बुडून मरून जातात. रस्त्यांवर चिखल आणि घाण साचते. डांस आणि इतर किटकांमूळे आजार पसरतात. घरांच्या जवळपास पाणी साचू देउ नये. त्यामूळे रोगराई रोखायला मदत होते.
अंगातून घामाच्या धारा निघाल्या नंतर खूप उकडा होऊ लागला की पावसाची आठवण होते. कडक उन्हाने धरणीमाता खूप तापते हवा गरम होते घशाला कोरड पडते. हे सर्व चांगले वाटत नाही हे सर्व संपून पहिला जोराचा पाऊस पडला की आपल्याला खूप चांगले वाटते मातीचा किती चांगला सुगंध सुटतो धरणी माता आनंदी होते शेतकरी शेतीची कामे सुरू करतात पावसाळा सुरू होणार याचा सर्वांना आनंद होऊ लागतो.
आकाशात ढग जमले की म्हणे मोरांना आनंद होतो. जसा मोरांना आनंद होतो तसा आम्हा मुलांनाही आनंद होतो. आम्ही हात आडवे पसरून गोल फिरत ये रे, ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा असं गाणं म्हणतो.
एप्रिल आणि मे महिन्याच्या प्रखर उन्हाळ्यानंतर येणारा पाऊस प्रत्येकाला आवडतो. पहिल्या पावसात भिजायला खूपं आवडतं. पण भिजून ओल्या कपड्यांनी घरी गेलं की आईच्या हातचा मारही मिळतो. मला तर घराच्या खिडकीतून रस्त्यावर पडणारा पाऊस बघायला खूप आवडतो. छत्र्या घेऊन जाणारी माणसं, रेनकोट घालून जाणारी मुलं, मोठी माणसं, पावसातून जाणारी माणसं, खड्ड्यात साचलेली डबकी, मधूनच जोरात वारा आला की एखाद्याच्या डोक्यावरची टोपी उडते, छत्री उलटते. रस्त्यावरून गाड्या जातात. त्या खड्ड्यात साचलेल्या डबक्यातून गेल्या की कडेला उभ्या असलेल्यांच्या अंगावर फवारा उडतो.
फवारा उडाल्यावर त्यांचा चेहरा फोटो काढण्यासारखा होतो. कुणी पावसामुळं झालेल्या निसरड्या रस्त्यावरुन घसरून पडतो. हे सारंच दृश्य मोठं मजेशीर असतं. आणि पहिला पाऊस पडल्यावर मातीचा जो सुगंध येतो ना तो तर नाकात भरून ठेवावासा वाटतो.
pavsala nibandh in marathi
आमच्या घराच्या मागच्या दारी सीताफळाचं आणि चाफ्याचं झाड आहे. काही फुलझाडं आहेत. तिथलं दृश्य तर फारचं सुंदर असतं. झाडांवर, पानांवर, फुलांवर पडणारा पाऊस, साचलेल्या पाण्यात पंख फडफडवून आंघोळ करणाऱ्या चिमण्या. सगळं बघत बसावसं वाटतं. मग थोडावेळ पाऊस थांबतो. मग मी आणि माझा मित्र कागदाच्या नावा करतो. त्या साचलेल्या पाण्यात सोडतो. त्या नावा तरंगू लागतात. मग हातानं पाणी हलवून नावा पुढं पुढं नेणं, त्यांच्या
शर्यती लावणं अशा खेळात किती वेळ जातो ते कळतंच नाही.पावसाळ्यात सकाळ, दुपार, संध्याकाळ या सगळ्या वेळा सारख्याच वाटतात. चार-चार, आठ-आठ दिवस सूर्यदर्शनच होत नाही. तेव्हा मात्र पाऊस थोडा थांबावा असं वाटतं. श्रावणातला ऊन पाऊस आम्हा मुलांना खूप आवडतो. दिवसा पावसाची भीती वाटत नाही. पण रात्री जोराचा पाऊस आला तर तो आवाज गंभीर आणि थोडासा भयानक वाटतो.
भीतीही वाटायला लागते. रात्री पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळं दिवे जातात. अंधार गुडुप्प होतो. मग अडगळीतले कंदील निघतात. मेणबत्त्या लावल्या जातात. अशावेळी काही सुचत नाही. एकदा मी आणि माझे बाबा घरी येत असताना जोराचा पाऊस आला. तेव्हा एका झाडाच्या बाजूला असंख्य छोट्या दिव्यांची माळ लुकलुकावी तसा प्रकाश लुकलुकत गेला. मी बाबांना विचारलं “बाबा, ते दिवे कसले?” बाबा म्हणाले, “ते दिवे नाहीत. ते काजवे आहेत” पावसाळ्यात बेडूकही ‘डरांव, डरांव’ करतात. कधी तो आवाज आवडतो तर कधी त्या आवाजाची भीती वाटते.
पावसाळा आला की नवीन रेनकोट, नवीन टोपी, नवीन पावसाळी बूट अशी मजा असते. मला नवीन रेनकोट, टोपी घालून शाळेत जायला खूप आवडतं. रस्त्यावरुन जाताना साचलेलं पाणी पाय आपटून उडवणं ही ही गम्मत करावीशी वाटते. पावसाळ्यात आणखी एक मजा असते. आमच्या गावच्या नदीला पूर येतो. तो आम्ही बघायला जातो. जिकडं तिकडं पाणी असतं. चहाच्या रंगाचं. फिकट तपकिरी रंगाचं. काही माणसं पुलावरुन पाण्यात उड्या मारुन पोहत असतात. ते बघताना आश्चर्य आणि भीती अशा दोन्ही गोष्टी मनात असतात.
पाणी देणारा पाऊस, मातीचा सुवास देणारा पाऊस, झाडांना जगवणारा पाऊस मला नेहमीच गमतीचाच वाटतो. पहिल्या पावसांचं मी नेहमीच स्वागत करतो.
झाडांची प्रचंड तोंड झाल्याने निसर्ग व हवामानाचा समतोल बिघडला आहे प्रत्येक मानवाने व शेतकऱ्यांनी झाडे लावून जंगले वाढविली तरच भरपूर पाऊस पडेल पाऊस पडणे आपल्याच हाती आहे असे समजावे लागेल.
माझा आवडता ऋतू – पावसाळा

pavsala nibandh in marathi -आपल्या देशामध्ये वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत व शिशिर असे सहा ऋतूंचे चक्र सतत फिरत असते. आपल्या दाहकतेने जीवन असह्य करून सोडणारा ग्रीष्म चराचरसृष्टीला तापदायक ठरतो. त्यानंतर मात्र चैतन्यमय नवजीवन देणाऱ्या वर्षाऋतूचे आगमन होते. म्हणून वर्षाऋतू म्हणजेच पावसाळा मला सर्व ऋतूंमध्ये अधिक आवडतो.
जूनमध्ये शाळेचे नवीन वर्ष सुरू होते. साधारणतः त्याच सुमारास पाऊसही येतो. त्यापूर्वी केव्हातरी एखादया वेळी मे महिन्याच्या अखेरीअखेरीला वळवाचा पाऊस म्हणून येऊन तो आपली झलक दाखवून जातो. भयंकर उकडत असते, माणसे हैराण झालेली असतात. अशा परिस्थितीत एकाएकी ऊन लोपते, मळभ येते, वारा सुटतो आणि मग अचानक टपटप असे पावसाचे मोठमोठे थेंब पडू लागतात. एखाददोन तास हा पाऊस पडतो पण मरगळलेल्या आसमंताला चैतन्य देतो, सुगंधित करतो. अगदी मोठी माणसेही या पावसात आनंदाने भिजून घेतात. हा पाऊस गारांच्या रूपात आला तर मग गारा वेचण्यात, खाण्यात आणि एकमेकांवर फेकण्यात वेगळाच आनंद मिळतो. वर्षातून एखादया वेळीच ही मजा लुटता येते.
हा पाऊस मोठा जादूगार आहे. कवी-कलावंतांनाही तो वेडावून टाकतो. कवी मंगेश पाडगावकर त्याला मित्र म्हणतात ‘मित्र आपुला पाऊस आला उघडा खिडक्या दारे। थेंब होऊनी मुठीत येती आभाळातील तारे।’ पावसाला भेटण्यासाठी आतुर झालेले कवी आरती प्रभू त्याला ये रे घना, ये रे घना अशी आर्ततेने साद घालतात. तर पावसात चिंब भिजून निघाल्यावर बा. भ. बोरकर गाऊ लागतात –
‘सरीवर सरी आल्या ग, सचैल गोपी न्हाल्या ग’
हा किमयागार जशी विविध रूपे दाखवतो तसाच आपल्या कारागिरीने वेगवेगळे चमत्कार घडवतो. प्रचंड, काळाभोर ढग आकाशात अवतरला की भरदिवसा रात्रच सुरू होते.
पाऊस पडून गेला की धुक्याने झाकोळलेल्या कातळावरून उड्या घेणारे लहान लहान धबधबे दिसू लागतात. पावसाची सर थांबते. अचानक उघडीप येते तेव्हा सारी जमीन हिरवागार गालिचा घातल्यासारखी वाटते. पाहावा तेथे धुंद करणारा हिरवा रंग दिसतो. कुठे दूर माळरानावर पोपटी रंग पसरलेला आहे, असा भास होतो.
अंधाऱ्या रात्री धो धो पाऊस कोसळू लागतो. त्या अंधारात जेव्हा लख्खकन वीज चमकते, तेव्हाच कोसळणाऱ्या धारांचे दर्शन घडते. हा आक्रमक पाऊस कृष्णजन्मा-ष्टमीची आठवण देतो. तर शांतपणे येणारी सर ही घरातील शालीन गृहिणीसारखी कर्तव्यतत्पर वाटते. paus nibandh in marathi
पावसाळ्यामध्ये अनेक जणांना चहा व भजी खूप खावेसे वाटतात. कारण वातावरणामध्ये खूप गारवा ओलावा असतो. त्यामुळे काहीतरी गरम असे खावेसे वाटते. त्याचबरोबर निसर्गही आपल्याला पोषक वातावरण देतो.
मला आवडणारा हा ऋतू जीवन देतो आणि सर्व चराचरात चैतन्य निर्माण करतो. धरतीमाता सुजलाम् सुफलाम् बनते. चार महिन्यांत हा पाऊस वर्षभराच्या पाण्याची, धान्याची बेगमी करतो. पावसाळ्यातील या सुखद आठवणींवरच आपण तापदायक उन्हाळा सहन करतो आणि हाच पावसाळा आपल्याला हिवाळ्याच्या रेशमी थंडीची लज्जत देतो. म्हणूनच मी म्हणते, की वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा हाच ‘ऋतुराज’ आहे.
पावसाने लावलेला हाहा:कार

pavsala nibandh in marathi- आमचं गाव हे कमी पावसाच्या टप्प्यातील आहे. त्यामुळे थोड्या पाण्यावर तयार होणारी पिके येथे घेतली जातात. घरांची बांधणीही धाब्याचीच; पण यंदा मात्र पावसाच्या हाहा:कारामुळे गावकऱ्यांना धक्काच बसला आणि धो धो कोसळलेल्या पावसाने सर्वांच्या तोंडचे पाणी पळवले.
गेले दोन दिवस पावसाची संततधार लागली होती. जरा विपरीतच वाटत होते; पण अमावास्या आली आहे म्हणून पाऊस पडत असेल, अशी लोकांनी समजूत करून घेतली होती.
nibandh on pavsala in marathi
आधीच खेडेगावातून या अमावास्येच्या रात्रीबद्दल अनेक अंधश्रद्धा जोपासलेल्या असतात. त्यात आता दाट काळोखात पाऊस कोसळत होता. एवढा मुसळधार पाऊस या गावाने कधी पाहिलाच नव्हता. म्हणून प्रथम कौतुकाने व नंतर घाबरून लोक जागे राहून पावसाचे तांडवनृत्य पाहत होते. पावसाचा जोर सतत वाढू लागला. पाऊस थांबण्याचे लक्षण दिसत नव्हते. त्यातच धरणाला धोका पोचू नये म्हणून वरच्या भागातील धरणाची दारे उघडली गेली. पाहता पाहता नदी पाण्याने फुगू लागली. नदीने आपली सीमा ओलांडली. नदीचे पाणी गावातून वाहू लागले. ‘पूर आला,’ हे लोकांनी ताडले. यापूर्वी गावावर असा प्रसंग कधीच आला नव्हता. मध्यरात्र उलटली तरी पावसाचा जोर कमी होत नव्हता. तो कोसळतच होता. आता मात्र सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले होते.
पावसाच्या जोडीला जोराचे वादळी वारे सुटले होते. जिकडे तिकडे पडझडीचे आवाज येत होते. या आवाजावरून काय काय पडले असावे याबद्दल अंदाज बांधले जात होते; पण घराबाहेर पडता येत नव्हते. उलट बाहेरचे पाणी मात्र घरात शिरू लागले. दरम्यान विद्युतपुरवठा बंद झाला होता. आकाशात चमकणाऱ्या विजेला पाहून जणू घरातल्या विजेने आपले तोंड काळे केले असावे. त्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले होते.
रात्र संपत आली, तसा पाऊसही थकला. त्याचा जोर कमी झाला. सूर्यदेव वर आला आणि आकाशही निरभ्र झाले. गावातील माणसे घराबाहेर पडून पडझडीचा अंदाज घेऊ लागली. गरीबांची कच्ची घरे, झोपड्या जमीनदोस्त झाल्या होत्या. त्यांनी देवळाचा आश्रय घेतला होता. पण देवही या वादळातून सुटला नव्हता; कारण देवालयाची देखील पडझड झाली होती. शेतातून चिखल माजला होता. शाळेच्या इमारतीचे छप्पर उडाले होते. पावसाने आमच्या छोट्याशा गावात नुसता हाहाकार उडवला होता.
अशाच प्रकारच्या पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा