Dr APJ abdul kalam information in marathi – स्वतंत्र भारतातील प्रक्षेपणास्त्रांचे (मिसाईल्स) निर्मिती, खऱ्या अर्थाने महान शास्त्रज्ञ व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम.

डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म
डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर, 1931 रोजी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व बेट असणाऱ्या दक्षिण भारतातील तमिळनाडूमधील रामेश्वरम येथे झाला.त्यांचे पूर्ण नाव अवुल पाकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम आहे. संक्षेपात ते एपीजे अब्दुल कलाम या नावाने ओळखले जातात.
डॉ. अब्दुल कलाम यांचे कौटुंबिक जिवन
लहानग्या अब्दुलचा जन्म गरीब, प्रामाणिक व सुसंस्कृत कुटुंबात झाला. ते त्यांचे आईवडील, दोन भाऊ व बहिणीबरोबर रामेश्वरमच्या मसजिद लेनमधील पूर्वजांच्या घरात राहत. रामेश्वरमचे प्रसिद्ध मंदिर त्यांच्या घरापासून दहा मिनिटे अंतरावर होते. त्यांचे वडील खूप शिकलेले नव्हते; पण व्यवहारी, कर्तव्यनिष्ठ व कष्टाळू होते.
कुटुंबाचा महत्त्वाचा आर्थिक मिळकतीचा स्रोत दर्शनास येणाऱ्या भाविकांना रामेश्वर ते धनुष्कोडी हे अंतर बोटीने नेणे-आणणे हा होता. समुद्रात 20 किलोमीटरचे हे अंतर होते. जे प्रभु रामचंद्रांच्या आंघोळ करण्याने पावन बनले होते. आर्थिक अडचणी असल्या तरी त्यांनी आपल्या या चुणचुणीत मुलाला रामेश्वरम प्राथमिक शाळेत घातले.
डॉ. अब्दुल कलाम यांनी आपल्या एका लेखात म्हटल्यानुसार त्यांच्या घराजवळ काही सुसंस्कृत हिंदू कुटुंबे राहत, ज्यांत रामेश्वरमच्या मुख्य मंदिराचे प्रमुख पुजारीही होते. लहानपणी अब्दुलला या सुसंस्कृत शेजाऱ्यांकडून अपार प्रेम, माया मिळाली. मुख्य पुजाऱ्यांच्या कुटुंबातील चांगल्या मूल्यांचा कलाम यांच्यावर प्रभाव पडला.
भगवद्गीतेत काय व कोणत्या संदर्भात सांगितले हे त्यांना समजू लागले. किंबहुना आजही ते शुद्ध शाकाहारी आहेत व गीतेतून प्रेरणा घेतात.
डॉ. अब्दुल कलाम शालेय जिवन प्रवास
दुसरे महायुद्ध संपले तेव्हा 15 वर्षांच्या अब्दुलने रामनाथपुरममधील जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या माध्यमिक शाळेत शिकण्याची परवानगी आपल्या वडिलांकडे मागितली. त्यांच्या वडिलांनी त्यांना आशीर्वाद दिले व रामनाथपुरममधील ख्रिश्चन मिशनऱ्यांनी चालवलेल्या स्वार्टझ हायस्कूलमध्ये घातले. ते वसतिगृहात राहू लागले.
त्यांच्या पालकांनी अडचणी असूनही त्यांची इच्छा मनात ठेवून त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. या चुणचुणीत व हुशार मुलाने त्याच्या शिक्षकांची मनेही जिंकली. त्यांनीही त्याला मदत केली. स्वार्टझ माध्यमिक शाळेतून 1950 साली उत्तीर्ण झाल्यावर जवळ असणाऱ्या तिरुचिरापल्ली येथे जाऊन सेंट जोसेफ महाविदयालयात पुढील अभ्यासासाठी कलाम यांनी प्रवेश घेतला.
डॉ. अब्दुल कलाम पदवी शिक्षण
आता त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला होता. त्यांचे इंग्रजीचे प्राध्यापक रेव्हरंड फादर आर. एन. सीक्वेरा त्यांच्या वसतिगृहाचे प्रमुख (वॉर्डन) होते. कलाम चार वर्षे महाविद्यालयात राहिले व त्यांनी बी. एससी. पदवी प्राप्त केली. महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षी त्यांना जाणवले की पदार्थविज्ञानात त्यांना रुची नाही. त्यांनी मद्रास तंत्रज्ञान संस्था (मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एम.आय.टी.) येथे प्रवेश घेतला व विमानशास्त्र अभियांत्रिकी (एव्हिएशन इंजिनिअरिंग) हा अभ्यासक्रम निवडला. आपण पायलट व्हायचे आता त्यांच्या मनाने घेतले. तीन वर्षांच्या अभ्यासानंतर प्रथम क्रमांक मिळवत त्यांनी पदविका प्राप्त केली.
एमआयटीमधील अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर कलाम बंगळुरू येथे हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लि. मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून दाखल झाले. विमानशास्त्र अभियांत्रिकीत पदवी प्राप्त केल्यावर व आपले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यावर त्यांच्यासमोर दोन पर्याय होते.
दोन्ही त्यांच्या आवडीचे होते. त्यांतील एक भारतीय विमानदलात दाखल होऊन वैमानिक बनण्याचा होता आणि दुसरा संरक्षण मंत्रालयाच्या तांत्रिक विकास व निर्मिती (डिरेक्टर ऑफ टेक्निकल डेव्हलपमेंट अँड प्रॉडक्शन डीटीडी अँड पी) चे संचालक होण्याचा. त्यांनी दोन्ही ठिकाणी अर्ज केले व दोन्ही ठिकाणी त्यांना मुलाखतीचे बोलावणे आले. दिल्लीला गेल्यावर ते मुलाखतीस गेले; पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे घडले नाही.
डॉ. अब्दुल कलाम यांची निवड
या मुलाखतीनंतर आठवडाभराने ते भारतीय विमानदलाच्या निवड समितीसमोर डेहराडून येथे हजर झाले. येथे शारीरिक स्वास्थ्याबरोबरच इतर अनेक बाबी लक्षात घेतल्या गेल्या. 25 अर्जदारांतून 8 जणांची निवड व्हायची होती. कलाम यांचा नववा क्रमांक आला. त्यांना वाटले की पायलट व्हायच्या संधीचे स्वप्न त्यांनी गमावले. वाईट वाटल्याने व नैराश्यामुळे ते ऋषिकेश येथे गेले. पवित्र अशा गंगा नदीत डुबकी मारल्यावर त्यांना आत्मशांतीचा अनुभव आला.
त्यानंतर ते जवळच असणाऱ्या ‘शिवानंद आश्रमात’ स्वामी शिवानंदांकडून मनःशांती मिळावी म्हणून गेले. स्वामींनी हसतमुखाने त्यांच्या निराशेचे कारण विचारले, कलाम
यांनी सांगितले की विमानदलात काम करण्याची संधी हुकल्यामुळे ते दुखावले आहेत. आश्वासक वागण्यातून स्वामींनी त्यांना सांगितले, नशीब कोणी बदलू शकत नाही. जे व्हायचे होते ते झाले! त्यामुळे निराश होऊ नकोस. कदाचित हे चांगल्यासाठीच झाले असेल. त्यामुळे देवाच्या इच्छेवर स्वतःला सोड. स्वामीजींशी बोलल्यावर कलाम यांना शांत वाटले. स्वामीजींना नमस्कार करून कलाम दिल्लीला परतले.
डीटीडी अँड पीचे 250 प्रतिमाह पगारावर वरिष्ठ वैज्ञानिक साहाय्यक (सिनिअर सायंटिफिक असिस्टंट) म्हणून काम करण्याचे नेमणूक पत्र त्यांची वाट पाहत होते. उत्तर भारतात कलाम तीन वर्षे राहिले. त्यांच्या सुरुवातीच्या कामांमध्ये ध्वनीपेक्षा अधिक वेगाने उडू शकणाऱ्या विमानाची निर्मिती हे काम होते. दरम्यान त्यांची बदली कानपूर या औदयोगिक शहरात एअरक्राफ्ट अँड अर्मामेंट टेस्टिंग युनिट (ए अँड एटीयू) मध्ये झाली. येथे ते विमानांची देखभाल कशी करतात व खराब झालेले भाग कसे बदलतात हे शिकले.
नंतर कलाम यांची बदली बंगळुरू येथे नव्याने स्थापन झालेल्या एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (एडीइ) येथे झाली. चार शास्त्रज्ञांच्या दलाचे नेतृत्व त्यांना करायला सांगण्यात आले. या दलाला तीन वर्षात पूर्णतः स्वदेशी हॉवरक्राफ्ट बनवण्याची, जबाबदारी देण्यात आली.
डॉ. अब्दुल कलाम आणि व्ही. के. कृष्ण मेनन यांची भेट
तत्कालीन संरक्षण मंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांना हे काम लवकर व्हायला हवे होते. ते जेव्हाही बंगळुरूला जात, तेव्हा या प्रकल्पाची प्रगती किती झाली हे आवर्जून पाहायला जात असत. शंकराचे वाहन असणाऱ्या ‘नंदीचे’ नाव हॉवरक्राफ्टला देण्यात आले व तो प्रकल्प यशस्वी झाला. 550 किलो वजन उचलू शकेल अशी तात्पुरत्या स्वरूपाची प्रतिकृती बनवण्यात आली. एकदा मेनन यांना या हॉवरक्राफ्टमधून प्रवास करून त्यांचा आनंद घ्यायचा होता. परंतु त्याआधीच कृष्ण मेनन यांनी संरक्षण मंत्रालय सोडले व प्रकल्प मागे पडला. पण हॉवरक्राफ्टचे यशस्वी प्रदर्शन झाल्याचे समजले व अनेक शास्त्रज्ञ आणि अभियंते यांनी एडीइला भेट दिली.
एकदा संस्थेच्या प्रमुखांनी कलाम यांना सांगितले की, एक उच्चाधिकारी ही योजना पाहण्यास येत आहेत. उच्चाधिकाऱ्यांनी प्रकल्पाविषयी व त्याच्या प्रगतीविषयी तपशीलवार माहिती विचारली. त्यांनी अनेक प्रश्न विचारले. कलाम यांना ते कोण होते याची कल्पना नव्हती. प्रत्यक्षात ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रीसर्चचे (टीआयएफआर) संचालक प्रा. एम. जी. के. मेनन होते.
मेनन यांच्या भेटीनंतर कलाम यांना इंडियन कमिटी फॉर स्पेस रीसर्च (इनस्कोपार) यांच्याकडून मुंबई येथे रॉकेट इंजिनिअर या पदासाठी मुलाखतीचे बोलावणे आले. भारतीय अवकाशविज्ञानाचे जनक डॉ. विक्रम साराभाई, प्रा. मेनन व डिपार्टमेंट ऑफ ऍटोमिक एनर्जीचे एक अधिकारी यांनी कलाम यांची मुलाखत घेतली. डॉ. साराभाई यांच्या मुलाखत घेण्याच्या पद्धतीने डॉ. कलाम अतिशय प्रभावित झाले. दुसऱ्याच दिवशी रॉकेट इंजिनिअर पदासाठी निवड झाल्याचे त्यांना कळवण्यात आले. पुढील काही दिवसांत त्यांच्या संगणकाच्या आवश्यक अशा मूलभूत प्रशिक्षणाची टीआयएफआर-मधील संगणक विभागात सुरुवात झाली. त्यांच्यामते टीआयएफ आरमधील वातावरण चांगले व इतर शासकीय खात्यांपेक्षा वेगळे होते.
1962च्या अखेरीस केरळमधील धुंबा येथे अग्निबाण प्रक्षेपण केंद्र स्थापन करण्याच्या शासनाने निर्णय घेतला. अमेरिकेतील नासा (नॅशनल एअरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिस्ट्रेशन ) येथे रॉकेट अभियांत्रिकीच्या 6 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी शास्त्रज्ञांच्या चमूसह कलाम यांची निवड झाली. अमेरिकेला जाण्यापूर्वी ते रामेश्वर येथे कुटुंबीयांसह काही दिवस घालवण्यासाठी म्हणून गेले. परदेशी जाण्याची त्यांना संधी मिळाली, हे ऐकून सर्व कुटुंबीयांना अतिशय आनंद झाला. त्यांच्या वडिलांनी देवाचे आभार मानले. सर्वांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.
सहा महिन्यांनंतर कलाम व त्यांचे सहकारी भारतात परतले. देशाचा पहिला अग्निबाण नाईक-अपाशे नासाकडून त्यांना भेट म्हणून मिळाला. या अग्निबाणाचे प्रक्षेपण 21 नोव्हेंबर, 1963 रोजी झाले. कलाम यांनी सर्व तांत्रिक बाबींची काळजी घेतली होती. या यशानंतर सर्व शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ यांचे मनोबल वाढले. त्यांनी ‘रोहिणी’ या नावे अग्निबाणांची मालिका वा तिचे प्रक्षेपण यांचा आराखडा बनवण्याचे काम सुरू केले.
डॉ. साराभाई यांनी बोलावलेल्या एका बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की, उपग्रह प्रक्षेपणयान (सॅटेलाइट लाँच व्हेईकल एसएलव्ही) या कृत्रिम उपग्रहांच्या अंतराळ कक्षेत उभारणीच्या दिशेने पावले उचलावीत. 20 नोव्हेंबर, 1967 रोजी ‘रोहिणी – 75’ नावाचे प्रक्षेपणास्त्र थुंबा विषुववृत्तीय अग्निबाण प्रक्षेपण स्थानकावरून अंतराळात सोडण्यात आले.
फेब्रुवारी 1969 मध्ये तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधनासाठी भुंबा येथे विषुववृत्तीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्घाटन केले. यामुळे कोणत्याही देशातील वैज्ञानिकास या प्रायोगिक स्थानकाची सुविधा वापरून फायदा घेणे शक्य झाले. यापूर्वी 1968 मध्ये भारतीय अग्निबाण समितीची (इंडियन रॉकेट सोसायटीची) स्थापना झाली. चेन्नईपासून शंभर किलोमीटरवर असणाऱ्या आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथे देशाचे दुसरे अग्निबाण प्रक्षेपण केंद्र स्थापन करण्यात आले. द इंडियन कमिटी फॉर स्पेस रीसर्च (इनस्कोपार) ची पुनर्रचना करण्यात येऊन ‘इंडियन स्पेस रीसर्च ऑर्गनायझेशन’ (इस्रो) या अंतराळ विभागाच्या अखत्यारीतील नव्या शासकीय संस्थेची स्थापना करण्यात आली.
30 डिसेंबर, 1971 रोजी दिल्लीतील समितीच्या सभेस उपस्थित राहून कलाम धुंबा येथे परतत होते. त्या दिवशी डॉ. साराभाई थुबा येथे होते. कलाम यांनी दिल्लीहून त्यांना फोन केला व त्यांच्या सभेबद्दल सांगितले. साराभाईंनी मुंबईला जाताना आपण तिरुअनंतपुरम येथे उतरणार असल्याने कलाम यांना तिरुअनंतपुरम विमानतळावर भेटीसाठी धांबण्यास सांगितले. पण कलाम विमानतळावर उतरताच त्यांना काही तासांपूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने साराभाई यांचे निधन झाल्याचे धक्कादायक वृत्त समजले. प्रा. सतीश धवन यांची इस्रोचे कार्याध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. एसएलव्ही प्रकल्प व्यवस्थापक म्हणून धवन यांनी कलाम यांचे नाव निश्चित केले.
डॉ. अब्दुल कलाम यांचे वडिलांचे निधन
वयाच्या 102 व्या वर्षी 1976 साली कलाम यांच्या वडिलांचे निधन झाले. कालांतराने त्यांची आईही गेली. या वैयक्तिक हानीचा त्यांच्यावर खूपच परिणाम झाला. पण आपल्या कामावर त्यांनी याचा परिणाम होऊ दिला नाही.इस्रोच्या अंतराळयान प्रकल्पाचे (एसएलव्ही-3) प्रमुख म्हणून कलाम यांनी अतिशय लक्षणीय कामगिरी केली. त्यांना प्राप्त झालेली मोठी संधी म्हणजे विदेशांतील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी विचारविनिमय करण्याची होती ज्यामुळे त्यांना हे जाणवले की, प्रक्षेपणास्राच्या विकासासाठी तंत्रज्ञानाचा अधिक वापर शक्य आहे.
18 जुलै, 1980 रोजी एसएलव्ही- 3 यशस्वीरीत्या सोडण्यात आले. उत्साहाने भारलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना आपल्या खांद्यांवर घेतले. लगेचच या प्रकल्पाच्या यशाची दूरदर्शन व रेडिओवरून प्रसिद्धी करण्यात आली. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी यशाबद्दल या संपूर्ण संघाचे अभिनंदन केले. अशा प्रकारचे असाध्य यश प्राप्त करणाऱ्या देशांच्या रांगेत आता भारताची गणना झाली.
या यशाच्या प्रसंगी कलाम यांना डॉ. साराभाई यांची आठवण आली व त्यांनी डॉ. सतीश धवन, डॉ. ब्रह्मा प्रकाश यांचे त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल व दूरदृष्टीबद्दल आभार मानले. 26 जानेवारी, 1981 रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन त्यांना गौरवण्यात आले.
31 मे, 1982 रोजी देशाच्या प्रक्षेपणास्त्र विकास विभागात प्रमुख म्हणून अठरा वर्षांच्या यशस्वी सेवेनंतर कलाम यांना ISROमधून निरोप देण्यात आला. विकास कार्यक्रमाचे डीआरडीएल (डिफेन्स रीसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी) मध्ये प्रमुख म्हणून जून 1982 पासून ते कार्यरत झाले.
स्वातंत्र्यानंतर 15-20 वर्षे भारताच्या सैन्य दलाला यंत्रांचे सुटे भाग व संरक्षण साहित्य यांसाठी सर्वथा पाश्चात्त्य देशांवर अवलंबून राहावे लागे. भारतासारख्या विकसनशील देशांना हे इतर देश आपल्या सैन्यातील कालबाह्य यंत्रसामग्री देत असत. जसे काही आपण उपकार करत आहोत अशा पद्धतीने साधनसामग्री देऊन हे देश पैसे कमवत.
ही उणीव दूर व्हावी यासाठी ही इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रामची (आयजीएमडीपी) योजना हैदराबाद येथील संरक्षण संशोधन व विकास प्रयोगशाळा (डिफेन्स रीसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी) येथे सुरू करण्यात आली. त्याची सर्व जबाबदारी कलाम यांच्यावर सोपवण्यात आली. आर्थिक अडचणींचा सामना करत, दिवसाचे 12-15 तास काम करत हा प्रकल्प त्यांनी पुढे नेला. यासाठी प्रक्षेपणास्त्रांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. याच प्रकारची प्रक्षेपणास्त्रे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांना जाणवले.
टोकावर बॉम्ब असणाऱ्या अग्निबाणास प्रक्षेपणास्त्र म्हणतात. प्रक्षेपणास्त्र हे प्रत्यक्षात विध्वंसक शस्त्र आहे. अंतराळात सोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अंतराळयानाचा याच्याशी संबंध नसतो. प्रक्षेपणास्त्रे ही विमानांतून, युद्धनौकातून व जमिनीवरून प्रक्षेपित करता येतात. ज्या प्रक्षेपणास्त्रांचे रेडिओ लहरी व अंतर्गत यंत्रणेने नियंत्रण करता येते, त्यांना ‘गायडेड मिसाईल्स’ (नियंत्रित प्रक्षेपणास्त्रे) म्हणतात. ही प्रक्षेपणास्त्रे विशिष्ट ठिकाणी स्थित असणारे आपले ठरावीक लक्ष्य शोधून काढू शकतात.
प्रतिप्रक्षेपणास्त्रे प्रक्षेपित प्रक्षेपणास्त्रांना त्यांच्या मार्गात रोखून धरून ती नष्ट करू शकतात. सुरुवातीला केवळ जर्मनी, अमेरिका, रशिया व चीन यांनी प्रक्षेपणास्त्रांची निर्मिती केली. भारताने रशियाच्या सहयोगाने ‘पृथ्वी’, ‘आकाश’, ‘नाग’, ‘अग्नि’, ‘त्रिशूल’ व ‘ब्राह्मोस’ या प्रक्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यास सुरुवात केली.
26 जून, 1984 रोजी कलाम यांच्या नेतृत्वाखाली सैन्यदलासाठी खास बनवण्यात आलेल्या ‘डेव्हिल मिशन’ची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ही प्रगती पाहण्यासाठी पंतप्रधान राजीव गांधी यांनी या स्थळी भेट दिली. 1985 च्या ऑगस्टमध्ये कलाम यांना अमेरिकेच्या वायुसेनेने त्यांच्या सुविधांना भेट देण्यासाठी इतर तीन सहकाऱ्यांसमवेत आमंत्रित केले.
श्रीहरिकोटा येतील चाचणी
APJ Abdul Kalam information in marathi
16 सप्टेंबर, 1985 रोजी त्रिशूल क्षेपणास्त्रांची श्रीहरिकोटा (एसएचएआर) येथे यशस्वी चाचणी झाली. 25 फेब्रुवारी, 1988 रोजी सकाळी 11 वाजून 23 मिनिटांनी पूर्णतः देशात बनवण्यात आलेल्या ‘पृथ्वी’ या क्षेपणास्त्राचे श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. हे क्षेपणास्त्र 1000 किलो वजनाचे बॉम्ब वाहून नेऊ शकणारे व 150 किलोमीटर मारक क्षमता असणारे होते. पाश्चात्त्य राष्ट्रांनी या यशाबद्दल चिंता व्यक्त केली व हा प्रयोग म्हणजे उघड धमकी असल्याचे मत व्यक्त केले. सात देशांनी भारताला आवश्यक असणारा कच्चा माल न देण्याचा निर्णय घेतला.
22 मे, 1989 रोजी सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी आण्विक क्षमता असणाऱ्या ‘अग्नि’ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. 26 जानेवारी, 1990 रोजी कलाम यांना ‘पद्मविभूषण’ हा बहुमान देऊन गौरवण्यात आले. जाधवपूर विद्यापीठ आणि मुंबईच्या आयआयटीने त्यांना मानद डॉक्टरेट या पदवीने गौरवले.माध्यमांनी त्यांचा उल्लेख ‘भारताचे मिसाईल मॅन’ असा करण्यास सुरुवात केली. 1997 मध्ये त्यांनी ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च बहुमान प्राप्त केला. असा बहुमान प्राप्त करणारे ते सर्वांत तरुण शास्त्रज्ञ ठरले.
कलाम यांची संरक्षण मंत्रालयाचे सल्लागार म्हणून नेमणूक झाली. 25 नोव्हेंबर, 1999 रोजी केंद्र शासनाचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झाली व त्यांना कॅबिनेट दर्जा मिळाला. 2020 पर्यंतच्या योजना आखून त्यांनी इंडिया-2020 हे पुस्तक प्रकाशित केले.
कलाम यांनी आपल्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागार पदाचा राजीनामा दिला व विज्ञानाची सेवा करण्याची योजना आखली. तमिळनाडूमधील अण्णा विद्यापीठात त्यांनी कार्यभार सांभाळला. याच दरम्यान राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीएने) त्यांची राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी निवड केली. लक्षणीय अशा बहुमताने त्यांची भारताचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली.
डॉ. अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती झाले
25 जुलै, 2002 रोजी कलाम यांना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बी. एन. किरपाल यांनी राष्ट्रपतिपदाची शपथ दिली. कलाम आपल्या देशाचे अकरावे राष्ट्रपती झाले.
सदैव हसतमुख असणारे कलाम हे साधे, विनम्र व मृदुभाषी आहेत. मुले, मित्र व सहकारी यांचे म्हणणे ते अतिशय शांतपणे ऐकून घेतात आणि त्यांना साध्या व सोप्या पदधतीने स्पष्ट करून सांगतात.
डॉ. अब्दुल कलाम यांचे निधन
तो दिवस 27 जुलै 2015 रोजी शिलाँग येथे भारतीय शास्त्र व्यवस्थापन IIM मध्ये एका कार्यक्रमादरम्यान अब्दुल कलाम यांची तब्येत बिघडली होती.ते तिथल्या एका कॉलेजमध्ये मुलांना लेक्चर देत होते, तेवढ्यात अचानक ते स्टेज वर पडले. रामेश्वरम येथे त्यांचे पार्थिव शरीर अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. हजारो च्या संख्येने लोके आली होती.अश्या महान शास्त्रज्ञाला माझा सलाम.
अशाच प्रकारच्या पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा