भारतातील अणुशक्ती केंद्राचे आद्य संचालक, श्रेष्ठ अणुशास्त्रज्ञ व विज्ञानमहर्षी डॉ. होमी भाभा यांनी अणुशास्त्र-संशोधनाच्या बाबतीत केलेली कामगिरी अपूर्व आहे. शांततेसाठी अणुशक्ती हे त्यांचे संशोधन जगभर गाजलेले आहे व त्यांच्या प्रयत्नामुळेच मुंबईजवळ तुर्भे येथे अप्सरा नावाचा पहिला ॲटॉमिक रिऍक्टर कानडा देशाच्या सहकार्याने बसविण्यात आला. डॉ. जहांगीर होमी भाभा हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारताचे थोर सुपुत्र होते.
डॉ. होमी भाभा हे भारताचे एक अतिशय हुशार आणि प्रसिद्ध वैज्ञानिक होते. त्यांना “भारतीय अणुशक्तीचे जनक” (Father of Indian Nuclear Program) असेही म्हटले जाते.
डॉ. होमी भाभा यांचा थोडक्यात परिचय

Homi bhabha information in marathi
पूर्ण नाव: | डॉ. होमी जहांगीर भाभा |
जन्म: | 30 ऑक्टोबर 1909, मुंबई |
धर्म: | पारसी |
शिक्षण: | केंब्रिज विद्यापीठ, इंग्लंड (Physics) – भौतिकशास्त्र |
पदवी: | डॉक्टरेट (PhD) – भौतिकशास्त्र |
ओळख: | भारतीय अणुशक्तीचे जनक |
छंद: | संगीत, चित्रकला, स्थापत्यकला |
महत्त्वाचे कार्य: | – अणुशक्ती संशोधनाची पायाभरणी – TIFR (टाटा मूलभूत संशोधन संस्था) ची स्थापना – BARC (भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र) ची स्थापना |
मृत्यू: | 24 जानेवारी 1966, विमान अपघातात |
डॉ. होमी भाभा यांचा जन्म
भारतीय परमाणू ऊर्जेचे जनक व महान वैज्ञानिक डॉ. होमी भाभा यांचा जन्म 30 ऑक्टोबर, 1909 रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव होमी जहांगीरजी भाभा होते. त्यांचे आजोबा होरमसजी भाभा म्हैसूर राज्याच्या शिक्षण विभागाचे महानिरीक्षक होते.
डॉ. होमी भाभा यांचे वडील
होमी भाभा यांचे वडील जहांगीर एच. भाभा ऑक्सफर्ड विदयापीठाचे पदवीधर होते आणि एक प्रमुख बॅरिस्टर होते. ते मुंबईमध्ये वकील होते आणि टाटा समूहाचे कायदाविषयक सल्लागार होते. याशिवाय, ते बंगळूर येथील भारतीय विज्ञान संस्थेत (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर) या संस्थेचे काउन्सिल सदस्य म्हणून टाटा कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत होते.
होमी यांची आई मेहराबेन मुंबईचे प्रमुख उद्योगपती व नागरिक सर दिनशा पेटीट यांची मुलगी होती. त्या सुंदर, दक्ष आणि सुसंस्कृत होत्या.
डॉ. होमी भाभा यांचे बालपण
होमी यांना लहानपणी खूप कमी झोप येईची. त्यामुळे ते कमी झोपत असत. त्यांच्या आई-वडिलांसाठी हा काळजीचा विषय होता. त्यांनी एखादया तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्याचा निर्णय घेतला. भारतात त्यांना असा कोणी तज्ज्ञ डॉक्टर न मिळाल्याने, ते त्यांना घेऊन लंडनला गेले.
डॉक्टरांनी होमीला तपासले व तो पूर्ण बरा असल्याचे सांगितले. त्यांना झोप न येण्याचे कारण त्यांचे अतिविचार करणारे डोके हे होते. डॉक्टरांनी सांगितले, हा मुलगा मोठेपणी अत्यंत प्रतिभावान होईल. हे ऐकून, त्यांच्या आई-वडिलांना अतिशय आनंद झाला व ते भारतात परतले.
डॉ. होमी भाभा यांचे शालेय शिक्षण
त्या काळात संपन्न आणि शिक्षित पारशी कुटुंबातील लोक इंग्रजी रीतिरिवाज आणि जीवनशैली यांचे अनुकरण करत. होमी यांच्या कुटुंबाचा स्तरही असा उच्च होता. त्यांनी होमीला मुंबईच्या कंथेंड्रिल स्कूलमध्ये घातले. या शाळेतील सर्व शिक्षक इंग्रज होते आणि शिकणारे अनेक विद्यार्थीही इंग्रज कुटुंबांतील होते. शाळेतील सर्व वातावरण ‘छोटे इंग्लंड’ असावे, असे होते. होमी अभ्यासात सर्वांत पुढे होता.
शाळेत त्यांनी अनेक शिष्यवृत्त्या व पुरस्कार मिळवले. अभ्यासाव्यतिरिक्त त्यांना कविता, संगीत व चित्रकला या विषयांतही रस होता. लहानपणापासूनच सुंदर चित्रे पाहून, ते तशीच हुबेहूब चित्रे काढत. त्यांनी सुंदर निसर्गचित्रे व व्यक्तिचित्रे रेखाटली होती. चित्रांच्या एका प्रदर्शनात त्यांनी बक्षीसही मिळवले.
त्यांनी काढलेली अनेक चित्रे आजही लंडनच्या आर्ट गॅलरीची शोभा वाढवत आहेत. विज्ञान आणि गणित हे त्यांच्या आवडीचे विषय होते. शाळेच्या ग्रंथालयाचा ते उत्तम वापर करत. त्यांच्या घरीही समृद्ध ग्रंथसंग्रह होता. वर्गात इतर विद्याथ्यर्थ्यांपेक्षा ते नेहमी पुढे असत.
Dr Homi Bhabha photo

डॉ. होमी भाभा यांचे महाविद्यालयिन शिक्षण
वयाच्या 16व्या वर्षी ते सीनियर केंब्रिजची परीक्षा उत्तीर्ण झाले व त्यांनी मुंबईच्या एल्फिस्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांचे वडील व परिवारातील सदस्य यांना असे वाटे की, होमी यांनी इंग्लंडला जाऊन अभियांत्रिकीची पदवी मिळवावी व जमशेदपूरच्या टाटा स्टील कंपनीत काम करावे.
त्यांनी इंग्लंडमध्ये अभियांत्रिकीत प्रवेश घेतला खरा, पण त्यांचा कल गणित व पदार्थविज्ञान यांकडे होता. त्यांनी वडिलांना पत्र लिहिले व पदार्थविज्ञानात अभ्यास करण्याची परवानगी मागितली. त्यांच्या चाणाक्ष वडिलांनी त्यांना अट घातली की, अभियांत्रिकी परीक्षेत जर ते प्रथम आले, तर त्यांच्या आवडीच्या पदार्थ-विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडमध्ये आणखी दोन वर्षे थांबू शकतील.
आज्ञाधारक मुलाने वडिलांचे हे आव्हान स्वीकारले. त्यांनी अभियांत्रिकी परीक्षेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि ते परीक्षेत पहिले आले. प्रथमतः त्यांनी अभियांत्रिकीची पदवी मिळवली. वडीलही मुलाच्या यशामुळे आनंदित झाले. त्यांनी दिलेल्या वचनानुसार होमीसाठी दोन वर्षे अभ्यास चालू ठेवण्याची व्यवस्था केली.
होमी यांना प्रोत्साहन मिळाले. त्यांनी सैद्धांतिक पदार्थविज्ञान (थिअरीटिकल फिजिक्स) हा विषय निवडला. आता ते अधिक काळ कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत घालवू लागले. अभ्यासातही ते आघाडीवर होते. इ. स. 1932 मध्ये त्यांना गणिताच्या अभ्यासासाठी ‘राउज बॉल’ शिष्यवृत्ती मिळाली. इ. स. 1933 मध्ये त्यांची ‘आयझंक न्यूटन शिष्यवृत्ती’साठी निवड झाली.
त्यावेळी इंग्लंडमध्ये ‘कपिटजा क्लब’ नावाचा अनौपचारिक समूह होता. या क्लबचे सदस्य दर मंगळवारी संध्याकाळी पदार्थविज्ञानासंबंधी चर्चा करण्यासाठी भेटत असत. याव्यतिरिक्त हे सभासद नाटक व खेळ (अॅथलेटिक्स) यांतही रस घेत. होमी भाभा यांना या क्लबमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.
आपल्या वास्तव्यादरम्यान ते वैश्विक किरणे (कॉस्मिक रेज) व मूलभूत कण (फंडामेंटल पार्टिकल्स) यांच्या अभ्यासात व्यग्र होते. त्यांचा पहिला शोधनिबंध इ. स. 1933 मध्ये प्रकाशित झाला. येथील अभ्यासादरम्यान त्यांनी युरोपमधील महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या. कोपनहेगनमध्ये वैज्ञानिक नील्स बोहर, झ्युरिचमध्ये प्राध्यापक वुल्फगंग पोली व रोममध्ये एनरिको फर्मी यांची भेट घेतली.
केंब्रिजमधील सर जॉन डग्लस कोक काफ्ट व गिलबर्ट न्यूटन लेविस यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. हे संबंध भारतात परतल्यावर त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यामध्ये अतिशय उपयुक्त ठरले.
डॉ. होमी भाभा यांचे विज्ञानातील शोध
इ. स. 30चे दशक (1930-39) हा पदार्थविज्ञान क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण काळ होता. यादरम्यान, अनेक नवीन शोधांची घोषणा झाली. वैज्ञानिकांचे लक्ष परमाणू ऊर्जेकडे केन्द्रित झाले होते. ही ऊर्जा कशी निर्माण केली जाऊ शकेल? हिचा कोठे व कसा वापर केला जाऊ शकेल? आतापर्यंत होमी भाभांनी वैश्विक किरणांचे स्वरूप व त्यांची वैशिष्ट्ये यावर प्रकाश टाकला होता.
त्यांनी कॉस्मिक किरणांमध्ये मेसान उपकणांच्या (सबपार्टिकल्स) संबंधात माहिती प्राप्त केली होती. त्यांनी कॅसकेड सिद्धांताबाबत (भंग पावणाऱ्या जलप्रपाताबाबत) महत्त्वपूर्ण वस्तुस्थिती प्रस्तुत केली होती. यादरम्यान त्यांचे ज्ञानही विकसित झाले होते.
इ. स. 1934 मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून पीएच. डी.ची पदवी प्राप्त केली. यानंतर 1939 पर्यंत ते केंब्रिजमध्ये राहिले. यादरम्यान त्यांना संशोधन करण्याची तसेच अनेक जगप्रसिद्ध वैज्ञानिकांशी विचारविनिमय करण्याची संधी मिळाली.
डॉ. होमी भाभा यांना जगातील वैज्ञानिकांत एक प्रतिभाशाली वैज्ञानिक म्हणून मान्यता मिळाली. इ. स. 1937 मध्ये त्यांना एक शिष्यवृत्ती मिळाली. त्याच वर्षी त्यांना त्यांच्या संशोधनाच्या प्रकाशनासाठी ‘एडम प्राइट’ पुरस्कारही मिळाला.
डॉ. होमी भाभा यांचे काम
इ. स. 1939 मध्ये सुट्टी घालवण्यासाठी ते भारतात परतले. त्याच वेळी युरोपमध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले होते. कॅव्हेंडिश प्रयोगशाळेतील त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना युद्धविषयक कामावर (वॉर ड्यूटी) बोलावले होते. विज्ञानातील संशोधनासाठी भारत सर्वांत उपयुक्त स्थान असल्याचे त्यांना जाणवले.
याच दरम्यान, प्राध्यापक सर सी. व्ही. रामन यांनी भाभा यांना बंगळूरच्या भारतीय विज्ञान संस्थेत एक विदयाशाखा सदस्य (फैकल्टी मेंबर) म्हणून कार्यभार स्वीकारण्यासाठी आमंत्रित केले. हा प्रस्ताव त्यांनी आनंदाने स्वीकारला व पदार्थविज्ञानाचे प्रपाठक म्हणून तेथे कार्यभार सांभाळला.
डॉ. होमी भाभा यांनी नवीन पदार्थविज्ञान युरोपमधून भारतात आणले. त्यांनी कार्यभार सांभाळल्यामुळे सी. व्ही. रामन यांचा उत्साह वाढला. येथे त्यांना वैश्विक (कॉस्मिक) किरणांवर प्रयोग करण्याची संधी मिळाली. विक्रम साराभाई यांनी देखील वैश्विक किरणांवरील आपल्या संशोधनासाठी त्यावेळी येथील कार्यभार सांभाळला होता.
या दोन महान वैज्ञानिकांची भेट म्हणजे दुग्धशर्करा योग होता. सी. व्ही. रामन यांनी शिफारस केल्यामुळे डॉ. होमी भाभा यांना दोन वर्षांत रॉयल सोसायटीची फेलोशिप प्रदान करण्यात आली. हा त्यांच्यासाठी एक मोठा सन्मान होता. याच दरम्यान, अलाहाबाद विद्यापीठ व कलकत्ता असोसिएशनने त्यांना प्राध्यापक या पदासाठी आमंत्रित केले. पण बंगळूरमध्ये प्रोफेसर पद स्वीकारून, तेथे राहणेच त्यांनी पसंत केले.
डॉ. भाभा यांनी टाटा ट्रस्टला विशुद्ध व उपयोजित पदार्थविज्ञानात (प्युअर अँड अॅप्लाइड फिजिक्स) मूलभूत संशोधनाचे (फंडामेंटल रीसर्च) महत्त्व समजावून दिले आणि परिणामस्वरूप, इ. स. 1945 मध्ये मुंबईमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टी. आय. एफ. आर.) ची स्थापना केली.
भाभा यांनी संस्थेची पूर्ण जबाबदारी सांभाळली. स्वातंत्र्य मिळाल्यावर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी देशातील महत्त्वाच्या वैज्ञानिकांची एक बैठक बोलावली. त्यांनी ‘भारतीय परमाणू ऊर्जा आयोगा ‘ची स्थापना केली व भाभा यांना त्याचे अध्यक्ष बनवले.
इ. स. 1948 मध्ये ‘भारतीय परमाणू ऊर्जा आयोगा’ची स्थापना केली गेली. याच्या अध्यक्षपदी देखील डॉ. होमी भाभा यांची नियुक्ती झाली. याचबरोबर केंद्र सरकारने परमाणू ऊर्जासंबंधात काम करण्यासाठी एक विभाग सुरू केला. डॉ. भाभा यांना या विभागाच्या सचिवपदाची जबाबदारीही देण्यात आली. अशा प्रकारे, ते विज्ञान, वैज्ञानिक व सरकार यांच्या दरम्यान मध्यस्थ बनले. ते बुद्धिमान व प्रतिभाशाली संशोधक, तसेच सक्षम प्रशासक म्हणून पुढे आले.
इ. स. 1954 साली मुंबईजवळील तुर्भे येथे ‘परमाणू संशोधन केंद्रा’ची स्थापना करण्यात आली. आज हे केंद्र ‘भाभा परमाणू संशोधन केंद्र’ (बी. ए. आर. सी.) म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. या केंद्रात आण्विक जीवशास्त्र (मॉलिक्यूलर बायोलॉजी), रेडिओ अॅस्ट्रॉनॉमी, इलेक्ट्रॉनिक्स अशा इतर क्षेत्रांतही संशोधन केले जाते.
टाटा मूलभूत संशोधन संस्था आता कुलाबा (मुंबई) येथील विस्तृत परिसरात देशाची प्रमुख संशोधन संस्था म्हणून मूलभूत संशोधनाशी संबंधित आहे.
इ. स. 1963 मध्ये डॉ. भाभा यांचे स्वप्न पूर्ण झाले. भारताचे पहिले आण्विक विदयुत केंद्र (अॅटॉमिक पॉवर स्टेशन) महाराष्ट्रात तारापूर येथे स्थापन करण्यात आले. आता देशात अशी आठ केंद्रे आहेत. गुजरातमध्ये काकरापार येथे आण्विक विद्युत केंद्र अशा दोन विभागांसह (युनिट्ससह) चालू आहे.
इ. स. 1956 साली होमी भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली भारताची पहिली अणुभट्टी ‘अप्सरा’ मुंबईजवळील तुर्भेमध्ये चालू करण्यात आली. ‘सायरस’ व ‘झरलीना’ नावाच्या दोन भट्ट्याही सुरू करण्यात आल्या. इ. स. 1959 मध्ये नाभिकीय धातू संयंत्र सुरू करण्यात आले.
त्यातून प्रत्येक वर्षी जवळपास 30 टन नाभिकीय श्रेणीच्या युरेनिअमची निर्मिती होई. इ. स. 1962 साली जड पाणी (हेवी वॉटर) संयंत्राची सुरुवात करण्यात आली. आज देशात अशा संयंत्रांची संख्या सुमारे दहा आहे. यांतील एक वडोदरा येथे असून, ते देशाच्या गरजा पूर्ण करत आहे.
इ. स. 1955 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने शांततेच्या उददेशासाठी अणुऊर्जेचा वापर या विषयावर आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन केले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदी होमी भाभांची नियुक्ती झाली. या संमेलनात त्यांनी जगाला शांततेचा संदेश दिला. तसेच आण्विक ऊर्जेच्या विघातक वापरावर प्रतिबंध घालण्याचे त्यांनी आवाहन केले व तिचा शाततेसाठी वापर करण्याचा आग्रह धरला.
इ. स. 1944 साली पाटणा विद्यापीठाने, इ. स. 1949 मध्ये लखनौ विद्यापीठ व इ. स. 1950 साली बनारस विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डॉक्टरेट देऊन गौरव केला. त्यानंतर त्यांना अनेक भारतीय व विदेशी विद्यापीठांनी मानद पदव्या देऊन गौरवले. इ. स. 1951 मध्ये त्यांची भारतीय विज्ञान समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. इ. स. 1954 साली त्यांना ‘पद्मविभूषण’ किताब देऊन गौरवण्यात आले. इ. स. 1961 मध्ये त्यांना डॉ. मेघनाद साहा सुवर्ण पदकाने सन्मानित केले गेले. इ. स. 1964 मध्ये त्यांना मंचेट पुरस्कार प्रदान करण्यात आला.
भारताच्या ‘परमाणुयुगाचे जनक’ म्हणून प्रसिद्ध असणारे डॉ. भाभा अत्यंत सदाचारी व विनम्र होते. अखेरपर्यंत ते अविवाहित राहिले. त्यांना त्यांच्या विवाहाबाबत कोणीतरी विचारले, तेव्हा ते म्हणाले, माझे प्रेम नवीन काही करण्याकडे केंद्रित आहे. फुरसतीचा वेळ ते संगीत ऐकण्यात वा चित्रे काढण्यात घालवत. त्यांचे असे ठाम मत होते की, अणुशक्तीच्या विघातक उपयोगास पायबंद घातला पाहिजे व तिचा उपयोग शांततेसाठी करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे.
संयुक्त राष्ट्र संघाची विज्ञानविषयक संघटना स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथे आहे. ते कामासाठी जिनिव्हाला जात, तेव्हा त्यांचे विमान आल्प्स पर्वतरांगांवरून जाई. आल्प्सच्या अप्रतिम सौंदर्याने ते इतके प्रभावित झाले होते की, त्याचे वर्णन ते नेहमी करत.
डॉ. होमी भाभा यांचा मृत्यू
24 जानेवारी, 1966 रोजी होमी भाभा व अन्य प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानात आल्प्स पर्वताच्यावर मध्येच आकाशात स्फोट झाला व ते आल्प्सच्या बर्फात कायमचे सामावून गेले. अणुऊर्जेबाबत भारताने जे कौशल्य, दक्षता प्राप्त केली आहे; तिचे श्रेय होमी भाभा यांना आहे. वयाचा केवळ 57 व्या वर्षीच या महान वैज्ञानिकास आपण सारे कायमचे गमावून बसलो.
अशाच प्रकारच्या पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा