varnanatmak nibandh in marathi – नमस्कार मित्रांनो वर्णनात्मक निबंध म्हणजे आहे तरी काय हे आपण जाणून घेऊ यात. पाहायला गेले तर निबंधाचे अनेक प्रकार आहेत. पण त्यातील एक आहे तो म्हणजे varnanatmak nibandh या मध्ये एखाद्या विषयाचे वर्णन केलेले असते जसे कि, इखादे स्टल असेल, माझे बाबा, माझी आजी इत्यादी.
माझी शाळा

माझी शाळा मला फार आवडते. गावाबाहेर उंच जागेत माझी शाळा आहे. शाळेभोवती सुंदर उंच झाडे आहेत. शाळेच्या जवळच खेळाचे मैदान आहे. आम्ही तेथे अनेक प्रकारचे खेळ दररोज खेळतो. आणि आम्ही शाळेतला दुपारचा मसाले भात खूप आवडीने खात होतो.
आम्ही शाळेत, मराठी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल असे विषय आणि कला, कार्यानुभव, खेळ हे इतर विषयही शिकतो. आमचे गुरुजी आम्हाला छान शिकवतात. मराठी पुस्तकातील कविता आम्ही चालीवर म्हणतो.
रेडिओवरील कविता व पाठ आम्ही ऐकतो. आता शाळेत टी.व्ही. पण आणलेला आहे. त्यावर आम्ही अनेक प्रकारचे शालेय कार्यक्रम पाहतो. शाळेच्या मागे व पुढे सुंदर बगीचा आहे.
बागेत सुंदर फुलझाडे व शोभेची झाडे, वेली आहेत. आम्ही मुलांनी सुरु, निलगिरी, पेरु, आंबा यांची झाडे लावली आहेत. आम्ही आमच्या शाळेची व बागेची काळजी घेतो. अशी माझी शाळा मला खूप खूप आवडते.
माझी आई

प्रत्येक मुलालाच नव्हे तर प्रत्येक प्राणी पक्षी यांच्या पिलांना सुद्धा आपली आई खूप आवडते. सतत आईचा सहवास त्यांना हवा असतो. आई इकडे तिकडे थोडा वेळ गेली तरी तिचा विरह त्यांना सहन होत नाही. तीच अवस्था माझी होती. इतकी माझी आई मला आवडते.
माझी आई, किती साधी राहते ! ती आमच्यासाठी तर किती कष्ट घेते! आम्हा सर्वांचे म्हणजे माझे, ताईचे आणि बाबांचे सर्व व्यवस्थित व्हावे म्हणून ती पहाटेपासून काम सुरू करते. दुपारी थोडी विश्रांती घेते पण रात्री आम्ही सर्व झोपल्यावर घरातील सर्व कामे आटोपून मगच ती झोपते.
कधी मी आजारी पडलो तर बराच वेळ माझ्याजवळ बसून राहते. काहीवेळेला तर माझे आजारपण काढताना रात्रीचेसुद्धा जाग्रण करते. पण इतके करूनही ती आमच्यावर कधी त्राग्याने ओरडत नाही की कधी भांड्यांचीं आदळआपट करून आपला राग कधी भांड्यांवर काढीत नाही. खूप सहनशील आहे माझी आई.
माझ्या आईचा देवधर्माकडे बराच ओढा आहे. तसेच मी व ताईने कसे वागावे अन् कसे वागू नये हे ती वरचेवर समजावून सांगते. मी झोपायला रात्री आईजवळच असतो. त्यावेळी काही वेळेला ती मला गोष्टी सांगते. आमचे शेजारीपाजारीसुद्धा माझ्या आईला खूप मान देतात. त्यांच्या घरात काही अडचणी आल्या तर ते आमच्या आईचा सल्ला घेतात. माझ्या आईला घरगुती औषधांचीही बरीच माहिती आहे. ते ती सर्वांना वेळप्रसंगी सांगते.
अशी ही माझी आई मला जन्मोजन्मी मिळावी.
माझे बाबा

माझे बाबा, माझे आवडते बाबा, कसे रूवाबदार दिसतात. बाहेर जाताना पैट, मॅनिला घालतात, तर घरात आले की पायजमा व बनियनवरच वावरतात. खूप डामडौलाने राहणे त्यांना आवडत नाही. पण नीटनेटकेपणाने राहणे त्यांना फार आवडते.
माझे बाबा सरकारी नोकरी करतात. ते काही खूप मोठे साहेब नाहीत पण काहीजण त्यांना साहेब म्हणतात. प्रत्येकाने मनापासून आपले काम करावे असे ते वेळोवेळी सांगतात. माझे बाबा आपले प्रत्येका काम अगदी वेळेवर करतात. कामावर त्यांचे फार प्रेम आहे. कामचुकार माणसांबद्दल ते अगदी कटुतेने बोलतात.
माझ्या बांबाचा रविवार मात्र घरातील आम्हा माणसांसाठी असतो. अशावेळी घरालगतच्या बागेतील झाडांची काळजी घेणे किंवा लांबवर सर्वांनी फिरायला जाणे असा आमच्या बाबांचा रविवारचा कार्यक्रम असतो. ते फारसे रागाने बोलत नाहीत पण एक दोन वेळेला समजावून देऊन तीच चूक पुन्हा मी केली तर मात्र मला रागवतात. त्यामुळे मला त्यांचा धाक वाटतो पण भीती वाटत नाही. शेजारपाजारचे लोकसुद्धा माझ्या बांबांना खूप मानतात.
जेवणानंतर सुपारी खाण्याशिवाय त्यांना कसलेही व्यसन नाही. दररोज रात्री आम्ही सर्वांनी एकत्र जेवण करणे त्यांना आवडते. माझ्यावर ते रागावलेले त्यांना मी कधीच पाहिले नाही. माझ्यावर माझ्या बांबांचे खूप प्रेम आहे. मला ते काहीही कमी पडू देत नाहीत.
माझ्या बांबांच्य। वरून कवितेतली एक ओळ आठवली, ‘फुलामध्ये फूल, फूल हुंगावे चाफ्याचे । सुख भोगावे बापाचे । बाळपणी.’
माझी आजी

माझ्या घरातील माझे खरे कोणते दैवत असेल तर ते माझी आजी. सतत माझ्या पाठीशी उभी राहणारी आजी. माझी आजी तशी सत्तर वर्षांची आहे म्हणतात. पण तिवे दात सोडले तर सगळे अवयव अगदी छान आहेत. रस्त्याने ती चालायला लागली तर तिला कोणी सत्तरीची म्हणणार नाही, अशी ती भरभर चालते.
याचेही एखादे कारण असावे. माझी आजी भल्या पहाटे उठते. तिचे नित्यनेम खूप आहेत. आंघोळ पूजा झाल्याशिवाय ती काही खात नाही. सतत कामात असते. ती फारशी चिडलेली तर कधी आठवतच नाही. म्हणूनच तिची तब्बेत चांगली असावी. ती आम्हा सर्वांना आग्रहानं खायला घालते, पण आपण मात्र ठराविक वेळी अगदी ठराविक पदार्थ खाते.
गोष्टी सांगाव्यात तर आमच्या आजीनेच. आम्हा घरातील माणसांनाच नव्हे तर शेजारपाजाऱ्यांनाही तिच्या गोष्टी फार आवडतात. काही वेळेला वाटतं आमच्या आजीनं ह्या एवढ्या गोष्टी कुठ अन् केव्हा वाचल्या असतील? ह्या साऱ्या गोष्टी तिच्या ध्यानात तरी कशा राहतात? नित्यनेमाने ती वर्तमानपत्र वाचते, पण गोष्टीची पुस्तकं मात्र वाचताना आजीला मी कधी पाहिलं नाही.
तरी तिला इतक्या गोष्टी कशा येतात? घरगुती औषधं आमच्या आजीला खूप माहिती आहेत. त्यातील काही तिच्याजवळ असतात. वेळप्रसंगी घरी अगर शेजापाजाऱ्यांना त्याचा चांगला उपयोग होतो.
माझी आजी वडीलांची आई असूनही आजीला आईच म्हणते. माझ्या आईवरही आजीचे खूप प्रेम आहे. तिचीसुद्धा ती खूप काळजी घेते. अशी आजी प्रत्येक घरात, असेल का?
माझे गुरूजी

आमच्या गावात सर्वांच्या आदरास पात्र ठरलेली कोणती व्यक्ती असेल तर ती म्हणजे माझे गुरूजी. माझे गुरूजी वाणी गुरूजी. गुरूजी अगदी साधेपणाने राहतात. त्यांचे ते धोतर, नेहरू शर्ट, वर जाकीट, डोक्यावर पांढरी शुभ्र टोपी अन् पायात फक्त मोज्याशिवाय बूट. या त्यांच्या पोशाखात कधीच बदल होत नाही.
वाणी गुरूजींची ती हसतमुख मूर्ती पाहिली की कोणालाही त्यांच्याविषयी आदर वाटल्याशिवाय राहणार नाही. शाळेत गुरूजी कधी उशीरा आलेले मला आठवत नाही.
गुरूजी एखादा धडा समजावून द्यायला लागले, म्हणजे सारा वर्ग कसा कान टवकारून त्यांचे बोलणे ऐकतो. वर्गातील मुले शांत राहावीत म्हणून कधी मुलांना त्यांना सांगावे लागत नाही, तर कधी डस्टर टेबलावर आपटून मुलांना शांत बसवावे लागत नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांस त्यांच्या प्रेमाचा धाक वाटतो.
शाळेत काही नवीन कल्पना लढवून काही चांगल्या प्रथा पाडाव्यात त्या वाणी गुरूजीनीच. ते कधी कुणावर अन्याय करणार नाहीत आणि आपल्यावर अन्याय झाला तर त्याला ते समजावून सांगत, त्याच्याशी वाद घालीत नसत. शाळेत जसा वाणी गुरूजींना मान आहे तसाच मान गावातील लोकसुद्धा त्यांना देतात.
केवळ ते माझेच गुरूजी नाहीत, तर गावाचेही गुरूजी आहेत. कुणाचे मूल आजारी पडले, तर घरगुती औषध सुचंव, कुणाच्या घरातील वाद मिटंव, कुणाच्या शेतातील पिकाबाबत शेतकऱ्याला सल्ला दे, कुणाच्या लग्नाकार्यात यथाशक्ती मदत कर. असे माझे गुरूजी ग्रामदैवतासारखे मलाच नव्हे तर सर्वांना आवडतात.
झाड बोलू लागले तर !
varnanatmak nibandh in marathi

त्या दिवशी रविवार होता. म्हणून मारूतीच्या देवळासमोरच्या पिंपळाच्या झाडाखाली बसलो होतो. ती उन्हाची वेळ असल्यामुळे खूप बरे वाटते होते. त्यावेळी मनात आले की झाड बोलू लागले तर !
झाड बोलू लागले तर ते आपली सुख-दुःखे सांगेल, म्हणेल ‘मधू, माझ्या सावलीत तुला छान वाटत असेल नाही! उन्हातान्हात वावरणारी किती तरी माणसे आमच्या सावलीत येऊन बसतात. किती सुख होते त्यांना ! आमची पाने, फुले, फळे, डहाळ्या या सगळ्यांचा उपयोग तुम्हाला होतो.
धार्मिक विधीसाठीसुद्धा आमच्यापैकी काहींची पाने, काटक्या उपयोगात आणतात. आम्ही किती उपयोगी पडतो तुमच्या! स्वतः उन्हापावसात उभे राहतो व तुम्हाला सावली देतो.
पण याची जाणीव तुम्हा माणसांना आहे का? तुम्ही लोक काही वेळेला उगीचच आमचा संहार करता. तुम्हाला गरज असेल तेवढ्या गोष्टी तुम्ही घेतल्या तर त्याचे काही वाटणार नाही. पण जणू काही आमचा सर्वनाश करायला निघाला आहात तुम्ही. यामुळे पण तुम्हीही सुखी होणार नाही. थोडा विचार करा. आमची काळजी घ्या. काळजी घेतली तर काळजी करावी लागणार नाही.
काही वेळेला तुमच्यातील काहीजण आमची काळजी घेतात पण ती अगदी थोडे दिवस. तुम्ही लोकांनीच मला पाणी घालून वाढविले. माझी काळजी घेतली पण अशी सगळ्यानीच आणि सगळ्या झाडांची काळजी घेतली पाहिजे.’
इतक्यात मित्राने हाक मारली तेव्हा मी तंद्रीतून जागा झालो. मी मनाशी ठरवले की दरवर्षी निदान एक तरी झाड लावायचे व वाढवायचे.
माझा गाव
प्रत्येकाला तसे आपले गाव फार आवडते. त्याप्रमाणे मलाही माझे गाव खूप आवडते.
दीडहजार लोकवस्तीचे गाव आहे माझे. गावाच्या पूर्वेला भैरवनाथाचा डोंगर असून त्या डोंगरात उगम पावलेला ओढा गावाजवळून वाहातो. ओढ्याचे वैशिष्ट्य म्हणजे बहुतेक बाराही महिने पाणी वाहात असते. गावाला त्याचा किती उपयोग होतो म्हणून सांगावा !
माझे गाव हमरस्त्याच्या कडेला आहे. गावात शिरले की मारूतीचे मंदिर लागते. मारूती हे आमचे ग्रामदैवत आहे. देवळापुढे पिंपळाचा पार आहे. उजव्याहाताला एक पाण्याची विहीर आहे. सारा गाव ह्या विहिरीचे पाणी पितो. थोडे पुढे आले की एक शाळेची इमारत आहे. सातवीपर्यंतचे वर्ग त्या शाळेत भरतात. जवळच ग्रामपंचायतीचे ऑफीस आहे.
गावातील रस्ते तसे फार रूंद नाहीत. पण माझ्या गावचे रस्ते मात्र स्वच्छ असतात. गावातील पाच वाडे सोडले तर बाकीच्यांची घरे फार मोठी नाहीत. थोडे पुढे गेले की विठोबाचे देऊळ लागते. त्यालगत मोठे वडाचे झाड आहे. केवढा विस्तार आहे बडाचा ।
अनेक जातीजमातीचे लोक माझ्या गावात आनंदाने राहतात. बहुतेक लोकांचा व्यवसाय शेती हाच आहे. विहिरींचे पाणी शेताला मिळते. बाजरी हेच पिक महत्वाचे. इतरही काही पिके होतात.
असे हे माझे गाव मला फार आवडते.
माझे घर
माझे घर खेडेगावात आहे. तसे ते जुनेच आहे पण मला ते खूप आवडते. माझ्या घराच्या भिंती दगडी असून वर पत्रा आहे अन् त्या खाली पाटणी आहे. त्यामुळे आम्हाला उन्हाचा त्रास अजिबात होत नाही.
पडवी, मधले घर, व मागची स्वयंपाकाची खोली आहे. घरासमोर मोठे बंदिस्त अंगण आहे. अंगणात एक तुळशीवृंदावन आहे. डाव्या हाताला गाई बैलांचा गोठा आहे. घराच्या डाव्या हाताला एक परडं असून त्या परड्यात वैरणीची गंज आहे. घराच्या मागे बंदिस्त मोकळी जागा म्हणजे परसू आहे. आम्ही त्या परसात पावसाळ्याच्या सुरूवातीस भाज्यांच्या बिया लावतो. त्याचे खूप मोठे वेल भितीवर पसरतात.
माझ्या गोठ्यात दोन गाई, दोन बैल, एक म्हैस व तिचे रेडकू आहे. आम्ही सर्वजण जनावरांचा गोठा अगदी स्वच्छ राखतो. संध्याकाळी आम्ही अंगणात खेळतो, केव्हा चांदणीभोजन करतो. खूप गंमत येते त्या वेळी.
घरात एक पत्र्याचा मोठा हौद आहे. त्यात आम्ही बाजरी ठेवतो. याशिवाय काही कणगी, कोथळ्या धान्य ठेवण्यासाठी आहेत. इतकेही करून धान्याची, शेंगाची पोती काहीवेळेला एकावर एक ठेवावीच लागतात.
माझे बावा, आई, आजी, मी अन् माझे दोन लहान भाऊ असे आम्ही त्या घरात राहतो. माझ्याकडे एक कुत्रा पण आहे.त्याचे नाव मोत्या आहे.तो खूप प्रामाणिक आहे. व सर्वांचा लाडका देखील आहे. कोणालाही आवडेल असेच माझे घर आहे.
फूलबाग
माझ्या घरी परसात मी एक फूलबाग केली आहे. बागेत अनेक फूलझाडे लावली आहेत. गुलाब, शेवंती, मोगरा, जाई, जुई, झेंडू, झेनिया, डेलिया ही झाडे लावली आहेत, काही झाडे रंगीत पानांची शोभेची आहेत.. काकडी, भोपळा, कारले, पडवळ, घोसाळी, तोंदले यांच्या वेली आहेत.
त्याचबरोबर वांगी, भेंडी, मिरची, टोमॅटो या फळभाज्या आणि मेथी, कोथिंबीर, चुका, शेपू, पालक या पालेभाज्या पण माझ्या परस बागेत लावल्या आहेत.
माझ्या या बागेमुळे आम्हाला कधीही फुले किंवा भाजीपाला विकत घ्यावा लागत नाही. बागेमुळे अनेक पक्षीं फुलासारखे घरी येतातं त्यामुळे घराची शोभा आणखी वाढते.
माझा रिकामा वेळ बागेला पाणी देणे, पालापाचोळा काढून टाकणे यात जातो. बागेतील फुला-फळांशी, झाडांशी, वेलींशी हितगुज करण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. मन प्रसन्न होते. बागकाम एक चांगला व फायद्याचा छंद आहे.
अशाच प्रकारच्या पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा